Breaking News

डॉल्फिनना जपायला हवे

कोकण किनारपट्टीवरील जलचरांचे जीवनचक्र तसेच त्यांच्या नैसर्गिक वृत्ती-प्रवृत्तींबद्दल अधिक माहिती मिळण्याची गरज आहे. यासंदर्भातील विशेष अभ्यासाला राज्यसरकारने यापूर्वीच हिरवा कंदिल दाखवला असून मृत मासे किनार्‍यावर वाहून येण्यामागचे  कारण समजण्यास त्यामुळे मदत होईल. मुंबईसह अवघ्या कोकण किनारपट्टीवरील प्रदूषणाचे परिणाम या अभ्यासातून पुढे येऊ शकतील.

डॉल्फिनच्या दर्शनासाठी कोकण किनारपट्टीला भेट देण्याबाबत देशभरातील पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण होऊ लागली असतानाच मृत डॉल्फिनचे किनार्‍यावर वाहून येणेही अधूनमधून सातत्याने निदर्शनास येते आहे. मुरुडच्या किनार्‍यावर अलीकडेच पुन्हा एकदा मृत डॉल्फिन वाहून आल्याने निसर्गप्रेमी संस्था व व्यक्तींकडून चिंता व्यक्त करण्यात आली. समुद्राच्या लाटांमधून उत्फुल्लपणे उड्या मारणार्‍या डॉल्फिनना पाहणे हा एक हरखून टाकणारा अनुभव असतो. पण तेच डॉल्फिन असे मृतावस्थेत किनार्‍याला लागलेले दिसले की हळहळ व्यक्त केली जाते. या डॉल्फिनच्या मृत्यूमागे नेमके काय कारण असावे- मोठ्या जहाजांचे महाकाय पंखे त्यांचा बळी घेतात की समुद्रातील प्रदूषण अशी चर्चा त्यावरून होते आहे. मृत जलचरांचे किनारी भागात वाहात येण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत निश्चितपणे वाढल्याचे संबंधित सरकारी यंत्रणेकडून सांगितले जाते. अर्थात 2014 पूर्वी याची नोंद ठेवणारी यंत्रणाच नव्हती. 2015 पासून मुंबई मॅन्ग्रोव्ह

कन्झर्व्हेशन युनिटकडून यासंदर्भातली आकडेवारी नोंदली जाऊ लागली आणि त्यावर्षी अशा 15 मृत माशांची नोंद झाली. त्यानंतर प्रतिवर्षी वाढत जाऊन 2018 मध्ये हा आकडा 34च्याही पुुढे गेला आहे. यात डॉल्फिनसोबतच कासवे, व्हेल तसेच फ्लेमिंगोंचाही समावेश आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मृत माशांच्या संख्येत वाढच होत राहील असा धोक्याचा इशारा संबंधित अधिकार्‍यांनी वेळोवेळी दिला आहे. किनारपट्टीवरील सागरी गोट्यांवर तेलमिश्रित वाळूचा थर दिसून येतो. मच्छिमार बांधवांच्या हाती लागणार्‍या माशांचे प्रमाणही कमी होत चालले असून हे सारेच समुद्राच्या पाण्यातील वाढत्या प्रदूषणाकडे निर्देश करते. मुंबई महापालिकेकडून सातत्याने प्रक्रिया न केलेले सांडपाणी समुद्रात सोडले जात असल्याने प्रदूषण होतेच. त्यात जहाजांकडून समुद्रात सांडल्या जाणार्‍या तेलाचीही भर पडते. या सार्‍याचा सागरी जीवसृष्टीवर निश्चितपणे प्रतिकूल परिणाम होतो आहे. मृतावस्थेत वाहून किनार्‍यावर आलेल्या माशांच्या विच्छेदनात प्रामुख्याने श्वसनयंत्रणेचा वा फुफ्फुसाचा जंतुसंसर्ग हे कारण दिसून येते. या जंतुसंसर्गामागे प्रदूषण वा समुद्रात सांडलेले तेल हेच कारण असल्याचे तज्ज्ञ सांगतात. समुद्रात तेल सांडण्याच्या बहुतेक घटनांमध्ये कुणीही त्याची जबाबदारी घेताना दिसत नाही. त्यामुळे या तेलाचा निचरा करण्याची जबाबदारी सातत्याने सरकारी यंत्रणेवरच येऊन पडते. परंतु सरकारी तेलकंपन्या वगळता कुणाकडूनही तेल सांडण्याची नुकसानभरपाई मिळत नाही. समुद्रात सांडलेल्या तेलाचा निचरा करण्याच्या कामी झालेला खर्च खाजगी जहाज व मालवाहतूक कंपन्यांकडून वसूल व्हायला हवा. परंतु अशी प्रकरणे दीर्घ काळ न्यायालयात प्रलंबित असलेली दिसतात. तुलनेने परदेशांत मात्र कंपन्यांकडून नुकसानभरपाई वसूल होताना दिसते. आपल्या यंत्रणांनाही यासंदर्भात अधिक सजग व चोख कामगिरी पार पाडावी लागेल.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply