संवेदनशील माणसांची व्यक्त होणे ही गरज असते. शब्द हे व्यक्त होण्याचे प्रभावी साधन आहे. मनात साचलेल्या भावभावना, संवेदना, जीवन जगताना आलेले कडू गोड अनुभव यांचा अंतर्मनातील अविष्कार म्हणजे पुस्तके, ग्रंथ! माणसे लिहित असतात, व्यक्त होत असतात आणि वाचणारे वाचत जातात, तादात्म्य होतात. कालानुरूप, व्यक्तीनुरूप लिहिण्याची भाषा, शैली. विचारांचे वेगळेपण त्या लिखाणातून डोकावत असते. काही पटत, काही पटत नाही. पण तरीही आपण वाचतच राहतो. व्यक्त होणारे व्यक्त होत राहातात. म्हणून वाचणारे आहेत तो पर्यंत लिहिणारे लिहित राहतील आणि लिहिते आहेत तोपर्यंत वाचणारे वाचत राहतील. इतर माध्यमांची कितीही आक्रमण झाली तरीही पुस्तके येत राहतील. ती आपली मित्र, गुरू, मार्गदर्शक असतात. रोज बरच काही नवे येत राहत. तरी जुने मनात ताजे असते, स्वतःच अस्तित्व जागवत. पुस्तके ज्ञान, वैचारिक ऐश्वर्य देतात, मनोरंजन करतात, जगण्याचा आधार असतात आणि आत्मानुभूतीपर्यंतचा आपला प्रवास सोपा करतात. म्हणूनच दासबोध ग्रंथात समर्थ रामदास स्वामी लिहून गेलेत ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे‘!
मजेत जगावं कसं? -शिवराज गोर्ले
जगण हे प्रत्येकालाच अनिवार्य आहे. हे जीवन जगताना प्रत्येकालाच जीवनातल्या सुख-दु:ख, आशा- निराशा,चढ -उतार या खेळाला सामोरं जावं लागतं. कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या कवितेप्रमाणे एखादा निराशावादी माणूस त्याच्या हातातला पेला अर्धा रिकामा आहे याचं दु:ख करीतच कसंबसं जगतो आणि खंगत मरतो. तर दुसरा आशावादी माणूस त्याच्या हातातला पेला अर्धातरी भरलेला आहे याचंच समाधान मानत जगतो आणि वर्षानुवर्षं नुसतं जगत राहतो, पण त्या दोघांच्याही हातातल्या पाण्यानं भरलेल्या तांब्यातलं पाणी पेल्यात ओतून तो पूर्ण भरावा आणि पोटभर पाणी प्यावं, ही साधी गोष्ट त्याना कुणीच कसं सुचवत नाही? त्यांना ती साधी गोष्ट सुचवण्याचं आजवर कुणी न केलेलं विधायक काम मराठी भाषेपुरतं पार पाडणारं खेळकर, खुमासदार, हलक्या फुलक्या शैलीतलं एक ’क्रांतिकारक’ पुस्तक म्हणजेच लेखक शिवराज गोर्ले याचं ’मजेत जगावं कसं’ हे पुस्तक ! यश, समृद्धी ,पैसा ,आनंद हे मिळवण्याचे मंत्र सांगणारी अनेक इंग्रजी पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत, परंतु यावर भाष्य करणारं मराठी भाषेतलं हे पहिलच पुस्तक असावं! राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. प्रत्येकान अवश्य वाचावं आणि आपल्या संग्रही ठेवावं असं हे पुस्तक!
धुनी -जगन्नाथ कुंटे
चार नर्मदा प्रदक्षिणा पायी करणारे जगन्नाथ कुंटे यांची आध्यात्म व साधना यावर आधारित प्राजक्त प्रकाशनची ‘ नर्मदा हर हर’, ‘साधनामस्त’, ‘नित्य निरंजन’ व ‘कालिंदी’ ही चार पुस्तके यापूर्वीच प्रकाशित झाली आहेत. त्यानंतरचं प्रकाशित झालेलं हे ‘धुनी’!
ते म्हणतात साधनेची धुनी अखंड पेटती राहायला हवी! साधकानं तेवढं करावं, बाकी सारं सद्गुरूंवर सोपवावं. ते सगळं करून घेतात हे प्रभावीपणे सांगणारी ही प्रत्ययकारी आणि उत्कंठावर्धक कहाणी! साधकांना प्रचिती देणारी आणि दिशा दाखवत गुंगवून ठेवणारी! एका अनोख्या विश्वाचं दर्शन घडवतानाच त्याचा मार्ग उजळवत जाणारी, अंतर्बाह्य शांती आणि सुखाचा मंत्र सांगणारी रसरशीत, अशी अनुभवसमृद्ध प्रवासगाथा! अध्यात्म सोप्या, गोष्टरुपात सांगणारं, श्रध्दावान लोकांच्या आणि तरुण वाचकांच्या मनाचीही पकड घेईल असं हे पुस्तक!
‘आ चल के तुझे, मै लेके चलू, एक ऐसे गगन के तले, जहा गम भी न हो, आसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले’, असं म्हणत, आध्यात्म म्हणजे कसं जगावं हे सांगणारं ज्ञान, म्हणजेच आयुष्याचं तत्वज्ञान आहे हेचं हे पुस्तक पानोपानी सांगत राहत!
बदलत गेलेली सही -अंजली कुलकर्णी
स्त्रीवादी कवितेचा धांडोळा या विषयावर लेख लिहिताना नुकताच हाताला लागलेला हा कवितासंग्रह! सही म्हणजे स्वओळख, ‘बदलत गेलेली सही‘ हा ग्रंथालीने प्रकाशित केलेला अंजली कुलकर्णी यांचा कवितासंग्रह म्हणजे माणसांच्या, हरवत चाललेल्या स्वच्या ओळखीचा, स्वच्या शोधाचा प्रवास.
एका बाजूला माणसांच्या जगण्याभोवती गरगरणारा आधुनिक काळातला, जागतिकीकरण, संगणकीकरण, युद्धखोरी आणि बाजारीकरणाचा भोवरा, त्यात हरवत चाललेला माणूस, ऐहिक लोलुपतेच्या एकाच साच्यातून जगणार्या माणसांचे यांत्रिकीकरण, त्याचे ताणतणाव आणि दुसर्या बाजूला यासकट आणि याशिवाय पुरुषी सनातनत्वाचे चटके आणि फटके सोसणारी, तरीही स्वतःची ओळख शोधू, जपू मागणारी स्त्री! नात्यांचे ताणतणाव पेलणारी! सारं जग एका थक्क करणार्या ऐहिक विकासाच्या उच्च बिंदूवर वेगानं पोचत असताना, जुन्याच परिघावर अडखळून उभी असलेली! अद्यापही चेहेराच न गवसलेली !
अंजली कुलकर्णी यांनी या आधुनिक काळात वावरणार्या माणसांच्या आणि विशेषकरून स्त्रीच्या दुःखाची दुखरी नस नेमकेपणानं या कवितासंग्रहात पकडली आहे. एकाच वेळी एकतानता आणि अलिप्तता, खोल विचारशीलता आणि उत्कट भावनाशीलता यांनी या कवितेच्या वस्त्राला झळझळीत फिरता रंग बहाल केला आहे.
क्षण क्षण शिक्षण -मानसी वैशंपायन
दैनिक तरुण भारतमधाील ‘क्षण क्षण शिक्षण’ या सदरामध्ये सलग दोन वर्ष प्रकाशीत झालेल्या साप्ताहिक विवेक प्रकाशित लेखांचे हे पुस्तक! आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके या प्रयोगशील, संस्कारक्षम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन या पुस्तकाच्या लेखिका !
‘जगाच्या अनुभव शाळेत’ आपण रोज हजारो नवनव्या गोष्टी कळत नकळत शिकत असतो. या अर्थाने माणूस जगाच्या पाठशाळेत निरंतर विद्यार्थीच असतो. शिकण्याचा प्रत्येक क्षण अनुभूती देणारा, जीवनाला समृद्ध करणारा असतो. याच विषयावर पुस्तकात प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षक हाच धर्म आणि विद्यार्थी हेच दैवत मानणार्या सर्वांसाठी हे पुस्तक आहे. ‘क्षण क्षण शिक्षण’ हे अनुभव चिंतन आहे. केवळ ‘आरामखुर्चीत’ बसून केलेले हे चिंतन नसून त्याला प्रत्यक्ष कृती, अनुभव, यांचे अधिष्ठान आहे. वाचकांशी मनापासून साधलेला हा संवाद आहे. या पुस्तकाचे स्वरूप विचार प्रधान आहे तरी ललित निबंधानाही जवळचे आहे. लेखिकेच्या समृद्ध व अनुभवी व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब त्यात आहे. शिक्षणशास्त्र या क्षेत्रातील तज्ञाचे विपुल संदर्भ या लेखात भेटत राहतात.
-अॅड. सुनिता जोशी, पनवेल