Breaking News

अच्छे दिन येणार

कोरोना काळात वाया गेलेली दोन वर्षे पाहता यंदा तरी सर्वसामान्य रीतीने गणेशोत्सव साजरा करता यावा अशी सर्वांचीच अपेक्षा होती. शिंदे-फडणवीस सरकारने ती पूर्ण केली असे म्हणावे लागेल. दहीहंडी आणि गणेशोत्सव हे दोन्ही गर्दीचे सण आहेत. त्यामुळे निर्बंधमुक्तीचे वरदान मिळाले असले तरी सर्वांनीच सद्सद्विवेकबुद्धी जागी ठेवूनच सामाजिक व्यवहार करायला हवेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्बंधमुक्तीच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक वातावरण चांगलेच सुधारेल यात शंका वाटत नाही.

देशभर गाजलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर अखेर येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. या नि:श्वासामध्ये एक नाकर्ते सरकार गेले ही भावना आहेच, परंतु त्याचबरोबर लोकभावनेचा आदर करणारे, हवेहवेसे सरकार सत्तेवर आले याचा आनंदही मिसळला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच सध्या नव्या सरकारचा कारभार पाहात असले तरी येत्या काही दिवसांतच मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला बघायला मिळेल. अर्थात, हे दोघेही कुठलाही निर्णय घेण्यास समर्थ आहेत याची चुणूक दिसतेच आहे. सत्तेवर आल्या-आल्या महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कारशेडचा प्रश्न नव्या सरकारने मार्गी लावला. निव्वळ अहंकारापायी मागील सरकारने या प्रकल्पाचे भजे करून ठेवले होते. जनहिताचे अनेक निर्णय गेल्या पंधरा दिवसांत घेतले गेले. आगामी गणेशोत्सव आणि त्याआधी येणारा गोपाळकाल्याचा उत्सव हे दोन्ही सण संपूर्णत: निर्बंधमुक्त असतील अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी केली, तेव्हा अनेकांना सुखद धक्का बसला. कोरोना काळात लादलेल्या अनेक जाचक नियमांमुळे गणेशोत्सव मनासारखा साजरा करता आला नव्हता. कोरोनाची साथ जोरात होती त्या काळात निर्बंध असणे समजून घेण्याजोगे होते, किंबहुना ते आवश्यकच होते, परंतु नियमांचा बागुलबुवा दाखवून श्रींच्या मूर्तींच्या उंचीवर मर्यादा आणणे, सुरक्षिततेची कारणे पुढे करून भक्तांच्या दर्शनावर निर्बंध लादणे, प्रदूषणाचे निमित्त पुढे करून ध्वनिवर्धकांवर तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर बंदी आणणे असे प्रकार केले गेले. या निर्बंधांना तार्किकदृष्ट्या विरोध करण्याचे कारण नाही, परंतु त्यामुळे गणेशोत्सव मंडळे आणि आयोजकांना काय भोगावे लागले हे सारा महाराष्ट्र जाणतो. गणेशोत्सव कार्यकर्त्यांवर शेकडो गुन्हे नोंदवण्यात आले ही वस्तुस्थिती आहे. गेले काही दिवस राजकीय धुळवडीमुळे राज्यातील वातावरण फार गढूळ झाले होते. मंगलमूर्तींच्या आगमनानंतर महाराष्ट्रातील उरलीसुरली विघ्नेदेखील उरणार नाहीत असा विश्वास वाटतो. शिंदे-फडणवीस सरकारची पडणारी पावले बघितल्यास त्याबद्दल खात्रीच वाटते. येत्या काळामध्ये हे नवे सरकार वेगाने वाटचाल करील आणि वाया गेलेला अडीच वर्षांचा काळ भरून काढेल असे वाटते, किंबहुना ते नव्या सरकारचे कर्तव्यच आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक शनिवारी पनवेल येथे होत आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी हे पक्षाचे तरुण नेते या बैठकीच्या आयोजनात विशेष प्रयत्नशील राहिले आहेत. राज्यातील सुखद सत्तांतरानंतर आता राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. मंगलमूर्तींच्या स्वागतासाठी शिंदे-फडणवीस सरकार सज्ज झाले आहे. अवघी सृष्टी श्री गजाननाची उत्सुकतेने वाट पाहात आहे. निर्बंधांचे जोखड फेकून देऊन आपणदेखील या महाउत्सवात सहभागी व्हायला हवे.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply