Breaking News

काँग्रेस, शेकापचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या प्रचारापासून दूर

चिरनेर : प्रतिनिधी

उरण, पनवेलमध्ये आमची मते असताना राष्ट्रवादीकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचा आरोप करीत शेकाप व काँग्रेसचे कार्यकर्ते पार्थ पवार यांचा प्रचार करण्यास नाखूश असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी गेल्या पाच वर्षांत श्रीरंग बारणेंनी ग्रामपंचायतींना खासदार निधी उपलब्ध करून विकासकामे केल्याने त्याची जाणीव ठेवून पार्थ पवारांपेक्षा आप्पा बारणेंना मतदान करू, असा पवित्रा या नाराज कार्यकर्त्यांनी घेतल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप महाआघाडीत खळबळ उडाली आहे. उरण तालुक्यात शेकाप व काँग्रेस या दोन पक्षांची मते असून, राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभेच्या उमेदवारीमुळे या पक्षाचे कार्यकर्ते लाइमलाइटमध्ये आले आहेत. काँग्रेस व शेकापमुळे पार्थ पवार यांना पनवेल, उरणमध्ये काही अंशी प्रतिसाद मिळत असताना प्रचाराची सूत्रे मात्र राष्ट्रवादीने आपल्याकडे ठेवली आहेत. त्यामुळे शेकाप व काँग्रेस कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीकडे ओंजळ पसरावी लागत आहे. काही स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या मनाला ही अपमानास्पद वागणूक रुचत नसल्याने ते पार्थ पवारांच्या प्रचारापासून दूर जात आहेत. खासदार श्रीरंग बारणे असोत की माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर त्यांच्याकडे कोणीही काम वा समस्या घेऊन गेल्यास ते सकारात्मक प्रतिसाद देतात, मात्र राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस व शेकापच्या कार्यकर्त्यांना बेदखल करीत असल्याने या अपमानाच्या पोळ्या खाण्यापेक्षा बारणेंना मदत केल्यास ते योग्य न्याय देतील, असा विश्वास शेकाप, काँग्रेसचे नाराज कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी महाआघाडीतर्फे नेमण्यात आलेले सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव व युवा नेते उमेश पाटील हे दोन्ही निरीक्षक कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. त्यातूनही नाराजी अधिक वाढल्याचे चित्र आहे.

Check Also

पनवेलच्या कल्पतरू सोसायटीत सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त शाश्वत ऊर्जा पद्धतीसाठी …

Leave a Reply