Breaking News

मोरबे धरणाची पाणीगळती थांबणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार पाटबंधारे विभागाने मोरबे धरणाच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाणीगळती थांबणार असून, जलाशयाखालील गावांना असलेला पुराचा धोकाही टळणार आहे.
पनवेल तालुक्यातील मोरबे धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत असतो. याव्यतिरिक्त पावसाळ्यात बंधारा फुटून त्याचा आजुबाजूच्या गावांना धोका निर्माण झाला होता. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते तसेच संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. यंदा जर याबाबत उपाययोजना केल्या नाहीत, तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागाने धरणाची डागडुजी सुरू केली आहे.
पनवेल तालुक्यातील खैरवाडी-गारमाळ परिसरात जवळपास 50 एकरावर मोरबे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या पाण्याचा वापर आजुबाजूच्या गावांतील शेतीसाठी तसेच मोरबे, दुंदरेपाडा, चिंचवली या गावांना पिण्यासाठी केला जातो. विशेष म्हणजे याच धरणातील पाण्यावरच गारमाळ, मोरबे, येरमाळ आदी परिसरातील नागरिक भाताचे दुबार पीक घेतात. या धरणाची क्षमता 3.22 दशलक्ष घनमीटर असून, 3.12 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असतो. पनवेल तालुक्यात पाणीटंचाई असताना मोरबे धरणातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे या धरणाची गळती थांबवावी, अशी मागणी धरण क्षेत्रातील ग्रामस्थ करीत होते.
मोरबे धरणाची निर्मिती 1973-74 साली करण्यात आली. धरणाचा मुख्य बांध दगडी भिंतीचा आहे आणि त्या भिंतीला तडे गेल्यामुळे यातून पाणीगळती होते. या बांधाला मधोमध भेगा पडलेल्या आहेत. धरणाचा बांध कमकुवत झाल्याचे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात पावसाचे प्रमाण खूप असते, मात्र अतिवृष्टी झाल्यास धरणाचा बांध फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशी दुर्घटना घडली तर त्याचा फटका आजुबाजूच्या गावांसह नवीन पनवेलला बसण्याची भीती होती. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी कार्यवाही करण्याचे आदेश  पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंत्याना दिले होते.
मोरबे धरणाच्या जलाशयाची पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकार्‍याने पाहणी केली. त्यानंतर क्षेत्रिय स्तरावर अंदाजपत्रक तयार करण्यात आले, परंतु कोरोना ामुळे काम सुरू होण्यास काहीसा विलंब झाला. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत या धरणाची दुरुस्ती महत्त्वाचे असल्याने पाटबंधारे विभागाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply