यंदा आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. या अमृत महोत्सवी वर्षात आदिवासी पाड्यातून आलेली एक कर्तृत्ववान महिला देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत येऊन पोहोचते, तो क्षण निश्चितच ऐतिहासिक मानायला हवा. समाजातील शेवटच्या स्तरावरील शेवटच्या व्यक्तीपर्यंत उन्नतीचा स्पर्श होणे हेच लोकशाहीला अपेक्षित असते.
भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी सकाळी धीरगंभीर समारंभात शपथ घेतली. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा निश्चितच एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण होता. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी श्रीमती मुर्मू यांना शपथ देवविली, तेव्हा मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी असे अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. दर पाच वर्षांनी राष्ट्रपती पदाचा कार्यकाल संपतो व नवा राष्ट्रपती निवडला जातो. त्यात नवे असे काही नाही. या आधी स्वतंत्र भारतात चौदा वेळा अशी नियुक्ती झालीच आहे. मग राष्ट्रपती पदी श्रीमती मुर्मू या विराजमान झाल्या यात ऐतिहासिक असे काय घडले असा प्रश्न कुणीही विचारेल. परंतु भारतीय लोकशाहीचा इतिहास पाहता या घटनेचे महत्त्व कळून येते. 1947 साली इंग्रजांनी गाशा गुंडाळला आणि भारतीय प्रजासत्ताक देशातील नेत्यांच्या स्वाधीन केले. स्वातंत्र्य संग्रामात अनेकांनी बलिदान दिले, हौतात्म्य पत्करले. भारताला मिळालेले स्वातंत्र्य सुखासुखी पदरात पडलेले नाही. त्याची जबर किंमत भारतीय जनतेने मोजली आहे. देश उभारणीसाठी सर्व जण पक्षभेद विसरून कामाला लागले, तेव्हा कुठे भाक्रा-नांगलसारखे विशाल धरण किंवा आयआयटीसारखी संस्था आणि विद्यापीठांची उभारणी होऊ शकली. श्रीमती द्रौपदी मुर्मू या संथाली नावाच्या आदिवासी जमातीतून येतात. अतिशय विवंचनांनी भरलेले असे त्यांचे बालपण होते. दुर्गम आणि अशिक्षित भागातून आलेल्या श्रीमती मुर्मू यांनी मोठ्या जिद्दीने स्वत:चे शिक्षण पूर्ण केले. त्या काळात ओडिशामध्ये भारतीय जनता पक्षाला नगण्य स्थान होते. त्या काळापासून निष्ठेने त्यांनी समाजाची सेवा सुरू ठेवली. राजकीय कारकीर्दीला बहर येत असतानाच दोन तरुण मुले आणि पती त्यांनी गमावला. कुटुंबाची वाताहत झाली तरी समाजसेवेचे व्रत त्यांनी सोडले नाही. झारखंडच्या राज्यपाल असताना आदिवासी समाजाचे भले व्हावे या हेतूने त्यांनी काही ठराव रोखून धरले आणि काही प्रमाणात पक्षश्रेष्ठींची नाराजी देखील ओढवून घेतली. स्वत:चे म्हणणे वरिष्ठांना पटवून देण्यात त्या यशस्वी झाल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे यश निश्चितच डोळ्यात भरण्याजोगे आहे. अर्थात, राष्ट्रपतीपदी स्थानापन्न होणे हे त्यांचे व्यक्तिगत यश जसे आहे, तसेच ते एकसंध समाज म्हणून आपल्या सर्वांचे आहे. एक आदिवासी स्त्री अत्युच्च स्थानी पोहोचेल याची हमी फक्त लोकशाही व्यवस्थेतच मिळू शकते. शपथविधी सोहळ्यानंतर राष्ट्राला संबोधित करताना नवनिर्वाचित राष्ट्रपती म्हणाल्या की जंगल आणि जलाशय या दोन्ही घटकांना मी फार जवळून पाहिले आहे. आसपासचे पर्यावरण सांभाळत देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याच्या दृष्टीने मी सदैव प्रयत्नशील राहीन. राष्ट्रपतीपदी बसणे हे माझे वैयक्तिक यश नव्हे. त्या पदावर माझ्यासारखीने बसणे हे लोकशाहीचेच प्रतीक आहे. महामहीम द्रौपदी मुर्मू यांचे हे उद्गार सदैव लक्षात राहतील.