Breaking News

उन्हाळ्यात भाज्यांची आवक घटली

पाली ः प्रतिनिधी

मार्चचा कडक उन्हाळा सुरू होताच पाली-सुधागडसह जिल्ह्यात मुंबई व पुण्यावरून येणार्‍या भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे भाज्यांच्या किमतीदेखील वधारल्या आहेत, मात्र जिल्ह्यात आदिवासी बांधव व स्थानिक शेतकर्‍यांच्या गावठी भाज्यांचे भरघोस उत्पादन येत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी व आदिवासी महिलांना चांगला रोजगार मिळतोय. वाढत्या महागाईत ग्राहकांना गावठी भाज्यांचा चांगला, आरोग्यवर्धक स्वस्त पर्याय उपलब्ध आहे.

जिल्ह्यात पुणे व वाशी येथील मंडईतून भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत येतो. उन्हाळ्यात कमी उत्पादनामुळे येथील भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. परिणामी किमतीदेखील वाढल्याचे प्रभात खंडागळे या भाजी विक्रेत्याने सांगितले. जिल्ह्यासह सुधागड तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या-पाड्यांवरील आदिवासी आपल्या परसात आणि डोंगर उतार व रानमाळावर विविध गावठी भाज्यांची लागवड करतात. परिणामी स्थानिक बाजारात आदिवासी व शेतकर्‍यांनी पिकविलेल्या भाज्यांना मागणी वाढली आहे. या भाज्या विकून स्थानिक शेतकरी व आदिवासी महिलांना चार पैसेदेखील मिळत आहेत.

आदिवासींबरोबर काही शेतकरीही या भाज्यांची लागवड करतात. सध्या बाजारात शिराळे, घोसाळे, कारली, माठ, वांगी, भेंडी, काकडी, दुधी, गवार, ठाकरी मिरच्या, टोमॅटो, नवलकोल, शेपू, मेथी अशा बहुसंख्य गावठी भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. अगदी 10, 15 व 20 रुपये जुडी, वाटा किंवा पाव किलो इतक्या स्वस्त दरात या भाज्या मिळतात. या वर्षी कोरोनाच्या संकटातदेखील भाव स्थिर आहेत. फारसी रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर न करता सेंद्रिय खतावर तयार झालेल्या या भाज्या आरोग्यवर्धक आहेत. त्यामुळे अनेक लोक पुण्या-मुंबईवरून येणार्‍या भाज्यांवर अवलंबून राहत नाहीत.

उन्हाळ्यातदेखील स्वस्त दरात व सहज मिळणार्‍या या गावठी भाज्यांना आम्ही अधिक पसंती देतो. गावठी भाज्या खाण्यास खूप चविष्ट असतात, तसेच त्या सेंद्रिय पद्धतीने उगवलेल्या असल्याने आरोग्यासदेखील लाभकारक असतात.

-कल्पना पवार, गृहिणी, वर्‍हाड जांभूळपाडा

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply