अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील नऊ नगर परिषदांच्या आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित पालिका कार्यालयांमध्ये गुरुवारी (दि. 28) सोडत काढली जाणार आहे, तर हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी 29 जुलै ते 1 ऑगस्ट असा कालावधी निश्चित करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगर परिषदांची सुधारित आरक्षण सोडत 28 जुलै सायंकाळी 4 वाजल्यापासून संबंधित पालिका कार्यालयात काढली जाईल. त्यानंतर आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना 29 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मागविता येतील. या आदेशाद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व त्यामधील महिलांसाठी यापूर्वी निश्चित केलेल्या आरक्षणात कोणताही बदल होणार नाही, मात्र सर्वसाधारण महिलांचे सोडतीद्वारे काढलेले आरक्षण रद्द करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.
नऊ मनपांच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑगस्टला होणार प्रसिद्ध
मुंबई ः औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर आणि नांदेड- वाघाळा या नऊ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर 22 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत, तर प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 2 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील.