Breaking News

साथीच्या आजारांसंदर्भात नवी मुंबई पालिका सज्ज

 वाशी रुग्णालयात डेंग्यू मलेरियासाठी वेगळा कक्ष

नवी मुंबई : बातमीदार

महापालिकेच्या वाशी रुग्णालयात मलेरिया व डेंग्यू रुग्णांवरील उपचारांकरिता वेगळा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच डेंग्यूच्या आजारामध्ये प्लेटलेट्सची रुग्णांना भासणारी गरज महानगरपालिकेमार्फत पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. प्लेटलेट्सकरिता आवश्यक असणारी मशीन महानगरपालिकेची स्वत:ची असावी असे आदेश आयुक्तांनी दिले. वाढत्या डेंग्यू, मलेरिया व स्वाईन फ्ल्यूच्या साथीवर पालिका आयुक्तांनी विशेष बैठक घेतली.

साचलेल्या पाण्यात डास अंडी घालत असल्याने हा काळ डास उत्पत्तीच्या दृष्टीने जोखमीचा आहे हे लक्षात घेऊन डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेणे व ती नष्ट करणे या मोहिमा अधिक काळजीपूर्वक व तीव्रतेने राबविण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागास दिले.

या वेळी मलेरिया व डेंग्यूच्या प्रार्दुभावाचा सविस्तर आढावा घेताना आयुक्तांनी ज्या परिसरात रुग्ण आढळले आहेत, अशी नागरी आरोग्य केंद्रनिहाय विभागणी करावी व त्यानुसार कृती आराखडा तयार करावा असे निर्देश दिले. त्याचप्रमाणे नागरी आरोग्य केंद्राच्या स्तरावरही कोणत्या भागात रुग्ण आढळताहेत त्या भागाकडे जास्त लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देशित केले.

मागील दोन वर्षांतील आकडेवारीचा तुलनात्मक अभ्यास करून त्या भागांकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित करतानाच बांधकाम साईट्स या डास उत्पत्तीच्या दृष्टीने जोखमीच्या आहेत. त्याकडे अधिक काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे असे निर्देश त्यांनी दिले. संबंधीत नागरी आऱोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी डास उत्पत्ती स्थाने शोध मोहिम तसेच धुरीकरण कार्यवाहीवर बारकाईने लक्ष द्यावे व या यंत्रणेवर संपूर्ण नियंत्रण ठेवावे अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.

बरेचदा मोठ्या सोसायट्यांमधून डास उत्पत्ती स्थाने शोधासाठी येणार्‍या महानगरपालिका कर्मचार्‍यांना प्रतिबंध केला जातो. या अनुषंगाने शोध मोहिमेसाठी सोसायट्यांमध्ये जाण्यापूर्वी तेथील अध्यक्ष अथवा सचिव यांना कळवून जावे व जाताना शोध पथकामध्ये शक्यतो एक तरी महिला कर्मचारी असावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या, मात्र प्रवेश नाकारणार्‍या सोसायट्यांवर सामाजिक आरोग्यविषयक कार्यवाहीला बाधा आणल्याने दंडात्मक कारवाई करण्यात यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

स्वाईन फ्लूबाबत अधिक खबरदारी

डेंग्यू व मलेरिया प्रमाणेच स्वाईन फ्लूचे रुग्णही आढळत असून त्याबाबत अधिक खबरदारी घेण्याचे निर्देशित करतानाच स्वाईन फ्ल्यूच्या लक्षणांविषयी तसेच तो होऊ नये म्हणून घ्यावयाच्या खबरदारीविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. त्याचप्रमाणे खाजगी व्यावसायिकांनाही त्याबाबत अवगत करावे, असे आयुक्तांनी सूचित केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply