करंजा-मोरा-कसारा ससून डॉक बंदरात सज्ज होतायेत बोटी
उरण : प्रतिनिधी
शासनाच्या खोल समुद्रातील 60 दिवसांच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या आदेशानंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. आता अवघ्या दोन दिवसांचाच अवधी उरल्याने मासेमारीच्या पूर्वतयारीसाठी करंजा-मोरा-कसारा, ससून डॉक बंदरात मच्छिमारांची लगबग सुरू झाली आहे.
खोल समुद्रातील मासेमारी 50 ते 60 वाव खोलीपर्यंत केली जाते. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच खवळलेला समुद्र शांत होतो. शांत झालेल्या सागरात पर्सियन नेट फिशिंगसाठी विशेषतः नारळी पोर्णिमेनंतर पोषक वातावरण असते. यंत्राच्या साहाय्याने जाळी मच्छिमार बोटीत खेचली जातात. यामध्ये घोळ, काटबांगडे, मुशी, तकला, सुरमई, शिंगाला, तुणा, हलवा, तांब, पाकट यांसारखी समुद्राच्या भूपृष्ठावरील तरंगती मासळी पकडली जाते. पर्सियन फिशिंगसाठी शासनाकडून सप्टेंबर महिन्यापासूनच सुरुवात करण्यास परवानगी असली तरी तरी या प्रकारातील मासेमारी ऑगस्ट महिन्यापासूनच केली जाते.
खोल समुद्रातील मासेमारीसाठीही मोरा-करंजा, कसारा, ससून डॉक बंदरात शेकडो मच्छिमारी ट्रॉलर्स सज्ज होऊ लागले आहेत. खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना 50 ते 70 वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका ट्रिपसाठी 10 ते 12 दिवस खर्ची घालावे लागतात. खोल समुद्रातील एका ट्रिपसाठी सव्वा ते दीड लाखांपर्यंत खर्च येतो. समुद्राच्या तळाशी असलेली सर्वच प्रकारची मासळी या पद्धतीत पकडली जाते. जाळी व बोटींची डागडुजी, रंगरंगोटी आणि इतर तत्सम कामांची विविध बंदरात मच्छिमारांची आतापासूनच लगबग सुरू झाली आहे.
मच्छिमार संस्थांकडून रांगा लावून डिझेल खरेदीऐवजी खुल्या बाजारातून डिझेल खरेदी करून 1 ऑगस्ट 2022 रोजीच मासेमारीचा श्रीगणेशा करण्याच्या तयारीत हजारो मच्छिमार गुंतले असल्याची माहिती व्यावसायिक रविंद्र कोळी यांनी दिली आहे.