Breaking News

सैन्याधिकारी पालकांच्या मुलीची एक आगळी देशसेवा!

कार्तिकी, वय वर्ष अवघं 17, इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. इथपर्यंतची ही ओळख सर्वसाधारणपणे इतर विद्यार्थ्यांचीही  बर्‍यापैकी अशीच असू शकते, मात्र कुमारी कार्तिकी संतोष महाडिक या मुलीची ओळख इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, सर्वांना प्रेरणादायी आहे.

कार्तिकीचे बाबा सैन्याधिकारी होते, तर आईदेखील सैन्याधिकारी आहे. महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील आरे या गावचे सुपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक हे 41 राजस्थान रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांना देशाच्या शत्रूशी लढताना दि. 17 नोव्हेंबर 2015 रोजी वीरमरण प्राप्त झाले. त्यावेळी कार्तिकी अवघी 10 वर्षांची होती. या कुटुंबावर मोठे आभाळ कोसळले, मात्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती संतोष महाडिकदेखील कणखर बाण्याच्या. सैन्याधिकारी पती शहीद झाल्यानंतर रडत न बसता त्यांनी अख्ख्या जगासमोर महाराष्ट्राच्या इतिहासातील राजमाता जिजाऊंच्या लढाऊ बाण्याचा आदर्श ठेवला. स्वाती महाडिक यांनी संरक्षण प्रशासनाकडे दाद मागितली आणि एका शहीद सैन्याधिकार्‍याची पत्नी पहिल्यांदा एक सैन्याधिकारी बनण्याचा इतिहास घडला. तोदेखील स्वकर्तृत्वावर, सैन्याधिकारी बनण्यासाठीच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन आणि त्यानंतरचे सर्व खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून!

असा आदर्शवत लढाऊ बाणा रक्तातच असलेल्या लढाऊ आईबाबांची लाडकी लेक कार्तिकी वेगळी कशी बरे असू शकेल. सैन्याधिकारी आई-वडिलांचे देशप्रेमाचे संस्कार लाभलेली कार्तिकी शालेय जीवनापासूनच अष्टपैलू. इयत्ता 7वीत असल्यापासूनच तिने भरतनाट्यम् हा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेला नृत्यप्रकार आत्मसात करण्यास सुरुवात केली. जसे जसे दिवस पुढे पुढे जाऊ लागले तसे तसे कार्तिकी कठोर मेहनत घेत भरतनाट्यम्मध्ये पारंगत होऊ लागली. आणि आता कार्तिकी तिच्या आई-बाबांसारखीच आपल्या भारतमातेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सज्ज झालीय. तेही आंतरराष्ट्रीय स्तरावर.

युरोपातील स्कॉटलंड या देशात एडिनबर्ग या ठिकाणी 1947 पासून सांस्कृतिक महोत्सव भरविला जातो. ज्यामध्ये देशविदेशातील विविध प्रकारच्या कलांचे प्रदर्शन उत्तमोत्तम कलाकारांकडून सादर केले जाते. कोरोनाच्या जागतिक संकटामुळे गेली तीन-चार वर्षे हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित होऊ शकला नव्हता. नजीकच्या काळात म्हणजेच 2018 साली या महोत्सवाच्या माध्यमातून जगभरातील तीन हजार 548 कलांचे 55 हजार सादरीकरणे एडिनबर्ग शहरातील 317 विविध ठिकाणी सादर करण्यात आली. प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यात हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक महोत्सव स्कॉटलंड या देशात भरविला जातो. हा कला महोत्सव तब्बल 25 दिवस सुरू असतो. यावर्षी हा महोत्सव 5 ऑगस्टला सुरू होऊन 29 ऑगस्टपर्यंत

सुरू राहिल.

अशा या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत मानाच्या  सांस्कृतिक महोत्सवात आपल्या कार्तिकीची भरतनाट्यम् नृत्यकलेतील अरंगेत्रम् हा विशेष प्रकार सादर करण्यासाठी निवड झाली आहे. तिच्यासोबत तिच्या सहकारी निकिता आणि अनन्या यादेखील असणार आहेत. चेन्नई येथील कलाक्षेत्र फाईन आर्ट्स या संस्थेच्या गुरू सी. के. राजलक्ष्मी आणि पंडित राजेंद्र गंगणी यांचे मोलाचे मार्गदर्शन या सर्वांना मिळाले आहे.

30 जुलै रोजी कार्तिकी आपल्या डेहराडून येथील शाळेत आपली कला सादर केली असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ती आपली कला स्कॉटलंड या देशातीलमधील एडिनबर्ग या शहरात होणार्‍या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात सादर करील. या वयात पितृछत्र हरविलेल्या भारतीय विद्यार्थिनीने आपल्या देशाचे, आपल्या शाळेचे या महोत्सवात प्रतिनिधित्व करण्याची स्वकर्तृत्वाने संधी मिळविणे, या यशाचे शब्दात वर्णन करणे तसे कठीणच आहे. एक प्रकारे कार्तिकीने वीरमरण पत्करलेल्या आपल्या वडिलांना आणि आता सध्या सैन्यात सैन्याधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या आईला आपल्या कर्तृत्वाने जणू कडक सलामीच दिली आहे.

कार्तिकी आणि तिच्या सहकार्‍यांना संपूर्ण भारत देशवासियांकडून लाख लाख शुभेच्छा..! जय हिंद..!

-मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग

आपल्या कलागुणांना जपा…

तू फार सुंदर लिहतोस, तू फार सुंदर बोलतोस, तू अभ्यासात हुशार आहेस, तू खूप सुंदर चित्र काढतोस, तू खूप सुंदर खेळ खेळतोस, तुझ्यात नेतृत्व गुण आहेत, असे बर्‍याचदा आपण बर्‍याच मित्रमैत्रिणींना म्हणत असतो. नक्कीच चांगल्या कामाची स्तुती व्हायलाच हवी पण कुणीतरी आपल्याही कामाची स्तुती करायला पाहिजे अशी किमान एक तरी कला आपल्यामध्येसुद्धा अवगत असायला हवी असे मला वाटते, परंतु आपण अनेकदा इतरांची स्तुतीच करत राहतो पण आपल्यातील कलागुणांचे काय? हा विचार अनेकजण करीत नाही.

एखादी कला, एखादे कौशल्य का महत्वाचे आहे याबद्दल सांगताना पु. ल. देशपांडे लिहतात की, उपजीविकेसाठी आवश्यक असणार्‍या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा. पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल. या चार ओळींमध्ये पु. ल नी अख् आयुष्याचे गूढ सांगितलेले आहे.

बर्‍याचदा आपण ताणतणावामध्ये आयुष्य जगत असतो. पण त्यातून बाहेर निघण्यासाठी कोणताही मार्ग भेटत नाही. मित्रांशी बोलू शकत नाही, भीती असते, पण एखादी कला आपल्यामध्ये अवगत असेल तर ती कला आपल्याला नक्कीच अशा कठीण प्रसंगातून बाहेर काढू शकते. त्यामुळे आपली आवड जपा, कलागुणांना वाव द्या. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. कारण आज जी माणसे आपल्यावर बोट दाखवतात तीच माणसे उद्या आपला बोट धरू शकतात. त्यामुळे किमान एक तरी कला आपल्या अंगी असावी..

आपण कोण आहोत? आपला जन्म कशासाठी झाला आहे? आपल्याला काय करायचे आहे? आपले ध्येय काय आहे? आपल्यातील गुण-दोष काय आहेत? अशा प्रश्नांची उत्तरे आयुष्यात जगतांना आपल्याकडे असतील तर नक्कीच असामान्य व्यक्तीमत्व होण्यापासून आपल्याला कुणीही थांबवू शकत नाही. पण त्या आधी स्वतःला ओळखणे खूप गरजेचे आहे. अशक्य वाटणार्‍या गोष्टी करुन बघा. सुरुवातीला चुका होतीलच, पण जो चुकांतून शिकतो तोच पुढे जातो हेही तितकेच खरे.

आज एखाद्याची ओळख आजूबाजूच्या लोकांना कशी होते तर त्याच्या कर्तृत्वामुळे, त्याच्यातील कलेमुळे. कला ही अशी एकमेव गोष्ट आहे की, ज्याच्यामुळे माणूस मरणानंतरही जिवंत राहू शकतो. त्यामुळे कला, कौशल्य विकसित करा.

स्वतःला ओळखा. कधीही स्वतःला कमी समजू नका, जो समोरचा व्यक्ती करू शकतो ते आपण सुद्धा करू शकतो. गरज आहे फक्त थोडी हिंमत करायची. एकदा हिंमत केली ना, करुन बघितले ना तर खरं सांगतो या जगात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही.

-सुरज पि. दहागावकर, चंद्रपुर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply