Breaking News

रायगडात पावसाची दडी

बळीराजा चिंतेत

अलिबाग : प्रतिनिधी

जुलै महिन्याच्या मध्यात जोरदार कोसळल्यानंतर आता रायगड जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. गेले आठ दिवस ऊन पडत आहे. त्यामुळे भात रोप करपण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.  बळीराजाची चिंता वाढली आहे. अशीच परिस्थिती पुढील काही दिवस राहिल्यास भाताची रोप सुकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रायगड जिल्ह्यात यंदा पाऊस उशिरा दाखल झाल्याने शेतकरी चिंतेत होता. जून महिन्यात सरासरीच्या 58.96 टक्के पाऊस पडला होता.  मात्र जुलै महिन्याच्या  मध्यात पावसाचे जोरदार आगमन झाले. सुमारे 10दिवस मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले होते. जुलै महिन्यात 1460.25मिमी पाऊस पडला. जुलै महिन्याच्या सरासरीच्या 125.96टक्के पाऊस पडला. समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतीची कामे वेगात झाली. जिल्ह्यात भात लावणीची कामे पूर्ण झाली आहेत.

सध्या भात रोपे फुटव्याच्या अवस्थेत आहेत. परंतु पासासाने दडी मारली आहे. जिल्ह्यात गेल्या आठ  दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानात बदल झाला असून, उष्णतेत काही अंशी वाढ झाली आहे. पाऊस गायब होवून उन्हाचा तडाखा वाढला आहे. येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही, तर रोपे सुकून करपण्याची शक्यता असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.

सध्या पाऊस पडत नसला तरी जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे सध्यातरी भात रोपांना भीती नाही. रोप फुटव्याच्या अवस्थेत आहेत. कुठेही रोगाचा प्रादुर्भाव नाही. आता पाऊस हावा, पण कमी हवा. जास्त पाऊस पडल्यास रोपे कुजू शकतात, असे रायगडचे कृषी उपसंचालक डी. एस. काळभोर यांनी सांगितले.

कृषी विभागामार्फत 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत किड रोग निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये गावोगावी शेतकर्‍यांच्या बैठका घेणे, शेती शाळा घेणे, शेतकर्‍यांच्या शेतावर शास्त्रज्ञांच्या भेटी आयोजीत करणे, इत्यादी उपक्रमातून शेतकर्‍यांमध्ये किड रोग व त्यांच्या उपाय योजनांविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

-डी. एस. काळभोर, कृषी उपसंचालक, रायगड

Check Also

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ‌सीकेटी‌ विद्यालयाचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल …

Leave a Reply