Breaking News

जवानांना वितरित करण्यात येणारा गहू हडप करण्याचा डाव उधळला

जासईतील वेअरहाऊसमध्ये साडेचार कोटींचा साठा जप्त

उरण ः वार्ताहर

देशाच्या सीमेवर दिवसरात्र शत्रूबरोबर लढणार्‍या लष्करी जवानांच्या ताटातील घास हडप करून तो परदेशात पळवण्याचा डाव महसूल विभाग आणि पोलिसांनी उधळून लावला आहे. देशभरातील लष्करी जवानांना वितरित करण्यासाठी 23 हजार 293 क्विंटल गहू घेण्यात आला होता. या गव्हाच्या 46 हजार 787 गोणी चोरट्या मार्गाने परदेशात पाठवण्यासाठी जासई येथील इनलाईन वेअरहाऊसमध्ये साठवण्यात आल्या होत्या. या कटाचा सुगावा लागल्यानंतर महसूल विभाग आणि उरण पोलिसांनी इनलाईनच्या गोदामावर छापा मारून हा गहू जप्त केला असून या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशभरात सार्वजनिक आणि लष्करासाठी वितरण करण्यात येणारा लाखो टन गव्हाचा साठा चोरट्या मार्गाने परदेशात पाठवला जाणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आणि महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी उरण परिसरातील गोदामांची झाडाझडती सुरू केली होती. या अंतर्गत जासई येथील इनलाईन वेअरहाऊसच्या गोदामावर शनिवारी छापा टाकला. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी गोदामातील मालाची आणि कागदपत्रांची कसून तपासणी केली. त्या वेळी ही धक्कादायक बाब उघडकीस आली. या वेळी बिले आणि कागदपत्रांची तपासणी केली असता त्यामध्ये अनेक उणिवा, अनियमिता आढळून आली. या गोदामात देशभरातील विविध राज्यांतील सरकारी नावे असलेल्या धान्याच्या हजारो रिकाम्या गोणींची बंडलही आढळून आली आहेत. गोदामात अवैधरीत्या 50 किलोच्या 46 हजार 787 गव्हाच्या गोणी ठेवण्यात आल्या असल्याचे तपासणीत आढळून आले. या गव्हाचे वजन 23 लाख 29 हजार 350 किलो इतके असून किंमत चार कोटी 67 लाख 87 हजार इतकी आहे. या प्रकरणी इनलाईन वेअरहाऊस गोदामाचे मालक प्रवीण अंचल आणि व्यवस्थापक सुमन कुमार या दोघांविरुद्ध उरण पुरवठा निरीक्षक सोमनिंगा बिराजदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply