50 शेतकर्यांकडून पारंपरिक पीकांना पर्याय
रोहे ः प्रतिनिधी
रोह्यात खरीप हंगामातील भात व नाचणीला पर्याय ठरू शकणार्या हळद लागवडीचा प्रयोग शेतकरी करीत आहेत. तालुक्यात या वर्षी 15 हेक्टरच्या आसपास हळद लागवड करण्यात येत आहे. रोहा तालुक्यात प्रामुख्याने भात व त्या खालोखाल नाचणी हे पिक घेतले जाते. अलिकडे तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून शेतीचे पर्यायी उत्पादन काढत आहेत. त्यातीलच एक पीक म्हणजे हळद. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रसह अन्य ठिकाणी हळद लागवड केली जाते. यासाठी पाण्याचे नियोजन महत्त्वाचे असल्याने ठिबक सिंचन करण्यात येते. कोकणात जास्त पाऊस पडत असल्याने खरीप हंगामात ठिबक सिंचनाची आवश्यकता नसते. त्यामुळे शेतकर्यांचा खर्च वाचतो. म्हणूनच हे पीक रोह्यातील पारंपरिक भातशेती व नाचणीपेक्षा फायदेशीर ठरत असल्याने वरकस भागात हळद लागवडीचा प्रयोग केला जात आहे. रोहा तालुक्यातील वरकस भाग असलेल्या तांबडी, विरझोली, कुडली, सुतारवाडी आदी भागांतील शेतकर्यांकडून यंदा हळद लागवड केली जात आहे. तालुक्यात मागच्या वेळी कृषी विभागाच्या ‘आत्मा’मार्फत 40 शेतकर्यांना हळद बियाणे देण्यात आले होते. गतवर्षी आठ हेक्टरच्या आसपास हळद लागवड करण्यात आली होती. यंदा कृषी विभागाच्या वतीने 50 शेतकर्यांना एकूण साडेदहा टन बियाणे वाटप करण्यात आले आहे. उत्पादन चांगले निघाल्यास एकरामागे प्रक्रिया न करता 80 ते 90 हजारांच्या आसपास खर्च वजा करता मिळतील असे तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी सांगितले. आता तालुक्यात हळद प्रक्रिया युनिट एका शेतकर्याने आणले असल्याने हळद प्रक्रिया केल्यास यांच्या उत्पादनामागे एकरी एक लाख ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळेल.