पाली : प्रतिनिधी
कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र कडकडीत उन्हात सुधागड तालुक्यात वाळवण संस्कृती मोठ्या प्रमाणावर टिकवली जात आहे. सध्या बहुतांश घरात पापड, कुरडया, चिकोड्या, शेवया, फेण्या, सांडगे यासारख्या वाळवणाच्या पदार्थांसह लोणची व मसाले तयार केले जातांना दिसत आहे, मात्र त्यासाठी मात्र शेजारी व आप्तेष्टांची काही प्रमाणात कमतरता असल्याने उत्साह कमी झाला आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्याने पावसाळ्यातील बेगमीसाठी उन्हाळ्यात करण्यात येणार्या विविध पदार्थांना अनेकजण मुकले होते. मात्र अनलॉकनंतर बाजार खुले झाले. लोकांनी बेगमीचे साहित्य आणूनही ठेवले आणि मागील आठवड्यात लॉकडाऊन लागू झाला. परिणामी सध्या बहुतांश घरात पापड, कुरडया, चिकोड्या, शेवया, फेण्या, सांडगे, लोणची व मसाले असे विविध पदार्थ तयार करण्याचा घाट घातला जात आहे.
सुधागड तालुक्यात आजही अनेक घरांमध्ये वाळवण संस्कृती जोपासली जात आहे. लॉकडाऊन असला तरी पावसाळ्यासाठी घरोघरी पापड, कुरडया, चिकोड्या, मिरगुंड, फणस व आंबा पोळी, मसाले, सांडगी, मसाले, विविध सरबते तयार करण्याचा घाट घातला जातोय. हे सर्व पदार्थ बनविण्यासाठी प्रत्येक महिला आपल्या शेजारणीकडे विनाशुल्क आनंदाने जात आहे. हे पदार्थ बनवितांना कधी गप्पा रंगतात, तर कधी गाणी गुणगूणली जातात. ज्या घरात हे पदार्थ बनविले जात असतात तिथे महिलांसाठी चहा-नाष्टा आदी दिले जाते. घरातील बच्चे कंपनीदेखील त्यांच्या मदतीला सज्ज असतात. घरातील मंडळींनी यासाठी मदत केली, असे पालीतील गृहिणी मीना रवींद्र नागोठकर यांनी सांगितले.
तयार पापड, कुरडया, मिरगुंड, फणस व आंबा पोळी, सांडगी मिरची, लोणची, मसाले असे पदार्थ तयार झाल्यावर आप्तस्वकियांसह (नातेवाईक) शेजार्यांनादेखील हौसेने चवीसाठी दिले जातात. या बरोबरच अनेक घरांच्या अंगणात, पडवीत, छतावर, कौलावर किंवा पत्र्यावर कापलेल्या आंब्याच्या फोडी आंबोशी करण्यासाठी ठेवल्या जात आहेत. सुकी मच्छी तसेच सरबत बनविण्यासाठी बाटल्यांमध्ये कोकम ठेवलेले दिसते.
पावसाळ्याची बेगमी व वाळवण संस्कृती कोरोनाच्या प्रादुर्भावातही सुरू आहे. फक्त त्यात थोडी बंधने आली आहेत. तरीही यंदा पावसाळ्यात लज्जतदार पदार्थ खाण्याची चिंता मिटली आहे. असे शिक्षक प्रशांत नागोठकर यांनी सांगितले.