उरण ः वार्ताहर
तालुक्यातील दिव्यांगांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी(दि. 3) अपंग दिनानिमित्ताने तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण केले होते. अखेर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे गुरुवारी (दि. 5) उपोषण पंधरा दिवसाकरिता स्थगित केले आहे. उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी लिंबूपाणी पाजून बेमुदत साखळी उपोषणाची सांगता झाली. उपोषणकर्त्यांच्या पुढील मागण्या मान्य केलेल्या आहेत. रायगड जिल्हा शल्य चिकित्सक) डॉ. गवळी यांनी कॅम्पमध्ये तपासणी झालेले असे 67 अधिक 38 दिव्यांग व्यक्तींना पुढील पंधरा दिवसात अपंग असल्याचे दाखले देण्याचे मान्य केले, तसेच ज्यांची कागदपत्रे गहाळ केली आहेत आणि तपासणी केलेली नाही अशा दिव्यांगांना पुन्हा एक कॅम्प पुढील पंधरा दिवसात घेवून त्यांची अपंग प्रमाणपत्रे एक महिन्याच्या आत देण्याचे लेखी कबुल केले आहे. सर्व दिव्यांग बांधवांना पिवळे अंत्योदय रेशन कार्ड देण्यास नायब तहसीलदार पेडवी यांनी आश्वासन दिले. राजीव गांधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्वांचे सध्या स्थितीत असलेल्या कागद पत्रांच्या आधारे पूर्ण करणार असे आश्वासन देण्यात आले. 5% नोकर्या संदर्भात पत्र व्यवहार करून त्या संदर्भात पुढील प्रयत्न तहसीलदार करणार आहेत. असे आश्वासन उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिले. ह्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यामुळे तीन दिवस चाललेले बेमुदत साखळी उपोषण मागे घेतले गेले आहे. परंतु जर पुढील पंधरा दिवसात दाखले मिळाले नाहीत तर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा अपंग संघटनेच्या वतीने दिला आहे.