रायगड-अलिबाग दि 10: मान्सूनमध्ये जिल्ह्यात घडणार्या विविध नैसर्गिक आपत्तींच्यासंदर्भात सर्व महत्वाच्या यंत्रणांनी त्यांचे नियंत्रण कक्ष सुरु करून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने गांभीर्यपूर्वक जबाबदारी पार पडावी, विशेषत: दरडग्रस्त, पूरग्रस्त भाग तसेच विविध घाट, पूल, रेल्वे मार्ग याठिकाणी अधिक सतर्कता पाळावी. यात हयगय झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे संबंधितांवर करावी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी सर्व विभाग प्रमुखांना मान्सूनपूर्व तयारीची पूर्तता 20 मे पर्यंत करावयाची आहे असे निर्देश दिले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदा सरासरीच्या 95 टक्के पाऊस होईल. गेल्या वर्षी 97.31 टक्के पाउस झाला होता तर 2017 मध्ये तो 118.46 टक्के इतका झाला होता.
आज आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेणारी बैठक पार पडली. निवासी उप जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे , अतिरक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच विविध विभाग प्रमुख, प्रांत अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे अधिकारी , अग्निशमन, वीज मंडळ, मेरिटाईम बोर्ड, होमगार्ड्स, कृषी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग आदि विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
1077 टोल फ्री क्रमांक
आपापल्या विभागाचे नियंत्रण कक्ष 1 जूनपासून कार्यान्वित करावेत तसेच यामधील काम करणार्या अधिकारी व कर्मचारी यांना गांभीर्यपूर्वक आणि जबाबदारीने काम करण्याची सुचना देण्यात यावी. मुख्य नियंत्रण कक्षात 1077 हा क्रमांक आपत्तीसाठी असणार असून यावरून आपत्तीत योग्य टी उपाययोजनाही केली जाणार आहे असे डॉ पद्मश्री बैनाडे यांनी स्पष्ट केले. कोणत्याही विभागप्रमुखांनी जिल्हाधिकार्यांच्या पूर्वसूचनेशिवाय मुख्यालय सोडू नये तसेच जिल्हा, तालुका, मंडळ पातळीपर्यंत सर्वांनी आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण घ्यावयाचे आहे. 20 मेपर्यंत सर्व विभागांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे जिल्हाधिकारी कार्यालयास मिळालेच पाहिजेत असेही त्या म्हणाल्या.
वीज मंडळ, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांनी तत्परता दाखवावी
महावितरण विभागाने धोकादायक खांब, ट्रान्सफॉर्मर्स, विद्युत वाहिन्या यावरील झाडांच्या फांद्यांचा अडथळा दूर करून घ्यावा तसेच त्यांचे सर्व विभागातील नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित राहतील असे पाहावे. नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद द्यावा. विविध घाट रस्ते, रेल्वे मार्ग, जिल्ह्यातील इतर मार्ग याठिकाणी दरड कोसळणे, झाडे पडणे, अशांसारख्या घटना घडतात. अशा जेसीबी, ट्रक्स लगेच उपलब्ध होतील तसेच जबाबदार अधिकारी यांची संपर्क अधिकारी म्हणून अशा ठिकाणी या कालावधीत नेमणूक करावी . विशेषत: कशेडी घाट, भोर, ताम्हाणी, सुकेळी खिंड, कार्ले खिंड, आंबेनळी, पोलादपूर, खालापूर , भिसे खिंड अशा घाटांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी. धुक्यातही दिसणारे सिग्नल्स व ब्लिंकर्स लावावेत, सुचना फलक योग्य ठिकाणी व स्पष्ट असावेत याची काळजी घेण्यास राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागास सांगण्यात आले.
दरडग्रस्त, पूरग्रस्त भागांवर
विशेष लक्ष ठेवावे
भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण विभागाने सर्व्हे केल्याप्रमाणे जिल्ह्यात 103 गावे दरडग्रस्त आहेत त्यच्प्र्माने महाड वगैरे सारख्या काही तालुक्यांत वारंवार पूर सदृश्य परिस्थिती उद्भवते. यासाठी प्रांत अधिकारी, तहसीलदार त्याचप्रमाणे नगरपालिका यांनी नागरिकांच्या स्थलांतराची योग्य व्यवस्था करावी, शाळा इमारती सुस्थितीत आहेत का ते पाहावे, रोगराई होणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. गुरे ढोरे पुरात बळी जाणार नाहीत हेही पाहावे, नगरपालिका कर्मचारी यांनी गटार-नाले यांची साफसफाई मे च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण झालीच पाहिजे, अग्निशमन पथक तयारीत असावे अशा सूचनाही देण्यात आल्या.
धरणाच्या पाण्याचे नियोजन
पूरग्रस्त गावे नकाशा पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा तसेच नोडल अधिकारी नियुक्त करावेत. धरणांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा करून विसर्ग, पाणीसाठा, पावसाचे प्रमाण यावर दैनंदिन लक्ष ठेवावे याशिवाय लाईफ जेकेट्स, यांत्रिक व रबरी बोटी, छोट्या होड्या या देखील उपलब्ध होतील, धरणांवर वायरलेस यंत्रणा कार्यान्वित राहील असे निर्देश देण्यात आले.
तटरक्षक दलाला देखील डायव्हर्स टीम तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. भरती ओहोटीचे वेळापत्रक मच्छीमाराना सांगण्यास हवामान खात्याच्या संपर्कात राहण्यास मेरिटाईम बोर्डास सांगण्यात आले
वीज अटकाव यंत्रणा तपासणे
पनवेल तालुक्यात गुळसुंदे व कर्जत तालुक्यात कशेळे येथे वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आली आहे, ती सुस्थितीत आहे का ते तपासण्यास सांगण्यात आले.
धबधब्यांच्या ठिकाणी काळजी
जिल्ह्यातील काही प्रमुख आणि अंतर्गत भागातील धबधब्यांवर पावसाळ्याच्या दिवसांत पर्यटक गर्दी करतात. त्याठिकाणी दुर्घटनाही घडतात. गर्दीला आवर घालण्यासाठी तहसीलदार, वन विभाग, पोलीस यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि कुठलाही अपघात होणार नाही हे पाहावे, याठिकाणी पोलीस संरक्षण व गस्तही वाढवावी, असेही बैठकीत ठरले. याशिवाय औद्योगिक सुरक्षा, परिवहन विभाग, एस टी महामंडळ यांना देखील सतर्क राहण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.
सागराला उधाण कधी?
जून महिन्यात समुद्राला हाय टाईड (4.5 मीटर पेक्षा जास्त उंच भरती) येणारे दिवस पुढीलप्रमाणे आहेत :
2 जून सकाळी 11.35, 3 जून दुपारी 12.14, 4 जून दुपारी 12.56, 5 जून दुपारी 1.40, 6 जून दुपारी 2.14, 7 जून दुपारी 3.11, 16 जून सकाळी 11.35, 17 जून दुपारी 12.15, 19 जून दुपारी 1.31, 21 जून दुपारी 2.43
1 जुलै सकाळी 11.14, 2 जुलै सकाळी 11.57, 3 जुलै दुपारी 12.41, 5 जुलै दुपारी 2.11, 6 जुलै दुपारी 2.57, 7 जुलै दुपारी 3.43, 16 जुलै दुपारी 12.04, 17 जुलै दुपारी 12.39, 18 जुलै दुपारी 1.12, 19 जुलै दुपारी 1.44, 20 जुलै दुपारी 2.16, 31 जुलै सकाळी 11.41
-जिल्हा माहिती कार्यालय, अलिबाग