मोरेवाडी ते गावंडवाडी मार्गासाठी आणलेली खडी जप्त; ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार
कर्जत : बातमीदार
परवानगी न घेताच आपल्या जमिनीतून रस्ता केला जात असल्याची माहिती मिळताच वन विभागाने त्या ठिकाणी वनरक्षक उभा करुन, मोरेवाडी ते गावंडवाडी या रस्त्यासाठी टाकलेली खडी जप्त केली आहे. तसेच संबंधीत ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याच्या कारवाईस वन विभागाच्या कर्जत वनक्षेत्रपाल कार्यालयाने सुरुवात केली आहे.
आदिवासी विकास विभागाच्या पेण येथील एकात्मिक प्रकल्प कार्यालयाकडून कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीमधील मोरेवाडी ते गावंडवाडी या रस्त्याचे काम करण्यासाठी 10 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र मोरेवाडी येथून गावंडवाडीकडे जाणारी जुनी पायवाट आणि बैलगाडी मार्ग वन जमिनीतून जातो. वनजमिनीमधून रस्ता तयार करता येत नसल्याने या रस्त्याचे काम अर्धवट राहिले होते. पावसाळाजवळ आल्याने या रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. वन विभाग रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने यावेळी कोणतीही परवानगी न घेता रस्ता पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. ठेकेदाराने रात्रीच्या वेळी जेसीबी मशीन आणून आणि रात्रीत रस्त्याचे खडीकरण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
दरम्यान, आपल्या जमिनीतून रस्ता केला जात असल्याची माहिती मिळताच वन विभागाने रस्त्याचे काम थांबवून ठेवले आहे. तसेच तेथे एक वन रक्षक उभा करून ठेवला असून, रस्त्यासाठी टाकलेली खडी जप्त केली आहे. आपल्या जमिनीत परवानगी न घेता रस्त्याचे काम करणार्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया कर्जत वनक्षेत्रपाल यांच्या कार्यालयाने सुरु केली आहे.
मोरेवाडी-गावंडवाडी या पायवाट रस्त्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात फार्महाऊस उभारण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या परिसरात जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता असल्याने रस्त्यासाठी रात्रीच्या वेळी जेसीबी मशीन लावून रस्ता बनविण्याचा प्रयत्न झाला आहे. दुसरीकडे वन विभागाने आता रस्त्याचे काम बेकायदा करीत असताना वन जमिनीचे नियम पायदळी तुडविल्याबद्दल वन विभाग त्या ठेकेदारावर कोणती कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
वन जमिनीत परवानगीशिवाय रस्त्याचे काम करीत असल्याची माहिती मिळताच आम्ही तात्काळ तेथे पोहचलो आणि काम बंद पाडले. वन विभागाच्या जमिनीत केलेल्या अतिक्रमणबाबत संबंधितांवर रितसर कारवाई करण्यात येईल.
-आर. जी. आढे, वनपाल, कर्जत