Breaking News

मूर्तिमंत जल्लोष

यंदाच्या गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह काही आगळाच आहे. गेली सलग दोन वर्षे गणेशोत्सव आटोपशीरपणे साजरा करणे आपल्याला भाग पडले होते. त्यामुळे यंदा जणू दोन वर्षांच्या अंतरानेच आपण हा उत्सव साजरा करीत असल्यासारखे भासते आहे. त्यामुळेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असोत वा घरगुती गणपतीच्या तयारीत गुंतलेली कुटुंबे, सगळेच आगळ्या उत्साहाने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक भूषण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्वसामान्यांच्या उदंड सहभागासह साजर्‍या होणार्‍या या उत्सवाची कीर्ती कधीचीच जगभरातही पसरली आहे. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांत दर्शनासाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी लोटूनही कायमच शिस्तीत हा सोहळा पार पडत आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात साकारले जाणारे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ असलेले देखावे व गणेशमूर्ती हे तर या अवघ्या सोहळ्याचे भूषणच. अफाट उंचीच्या गणेशमूर्ती, ढोल-ताशांच्या गजरात होणारे त्यांचे आगमन, भक्तांच्या लांबच लांब रांगा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या सार्‍यात कधी खंड पडेल असे कुणाच्या मनातही आले नव्हते, परंतु अकल्पित अशी कोविड महासाथ आली आणि सार्वजनिक गणेशोत्सवातील गणरायाचे ऑनलाइन किंवा टीव्हीवर दर्शन घेऊन समाधान मानण्याची वेळ महाराष्ट्रातील जनसामान्यांवर आली. पहिल्या लाटेच्या वेळी गणेशोत्सवाच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढलेली होती की सार्‍यांनाच पुरोहितांशिवाय, अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणे भाग पडले. ना वाजतगाजत गणरायाचे आगमन होऊ शकले, ना कुणी कुणाच्या घरी दर्शनासाठी जाऊ शकले. अनिश्चिततेमुळे काळोख्या भासणार्‍या त्या दिवसांमध्ये ‘संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया’ असे म्हणत त्या विघ्नहर्त्याचा धावा करण्यापलिकडे आपल्या हातात काहीही नव्हते. आता तो अंध:कारमय कालखंड इतका मागे पडला आहे की त्याच्या आठवणीही नकोशा वाटतात. मागच्याच वर्षी लोकांच्या उत्साहाने थोडेफार डोके वर काढले होते, परंतु तेव्हाच्या आघाडी सरकारने जाचक निर्बंध लादून पुन्हा एकदा आटोपशीर गणेशोत्सव साजरा करणे भाग पाडले. कोरोनाच्या भीतीमुळे तशी खबरदारी घेणे आवश्यक होते, परंतु काही बाबतीत केला गेलेला अतिरेक टाळता येऊ शकला असता. ठाकरे सरकारच्या नियमावलीचा अवघा भर सार्वजनिक गणेशोत्सवाला अटकाव करणारा का होता, कुणास ठाऊक? पण घरगुती गणेशोत्सव साजरा करणार्‍यांनी मात्र दुसर्‍या लाटेच्या वेळीच सरकारच्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून गणरायाचे स्वागत उत्साहात केलेच. असो. कोविड काळातल्या कटु आठवणी मागे टाकून लोक यंदा पूर्वीच्याच, कदाचित काकणभर अधिकच उत्साहात गणरायाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारनेही सत्तेवर येताच पूर्णपणे निर्बंधमुक्त गणेशोत्सव यंदा साजरा करता येणार असल्याची घोषणा केली. जनभावनेचा आदर करणार्‍या सरकारच्या कारभाराची ती नांदी होती आणि निव्वळ निर्बंधमुक्तीची घोषणा करून हे सरकार थांबले नाही, तर लोकांना पूर्वीसारख्या उत्साहात हा सोहळा साजरा करता यावा यासाठी अनेक पावले उचलण्यात आली. गणेशमूर्तींच्या उंचीवरील मर्यादा उठवण्यात आल्याने मंडळांचा उत्साह दुणावला. टोलमाफी व परिवहन विभागाच्या ज्यादा गाड्यांमुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍यांचा उत्साहही वाढला. एक नाकर्ते सरकार जाऊन, श्रीगणेशाच्याच कृपेने एक लोकाभिमुख सरकार राज्याला लाभले आहे. त्यामुळेच गणेशोत्सवाचा झगमगाट राज्यभरात परतला असून मने उजळून टाकणारे उत्सवी चैतन्य राज्यभरात पसरले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply