पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजची विद्यार्थिनी तनया ऋषिकेश म्हात्रे ही विद्यार्थिनी गतवर्षीच्या 2021-22च्या राष्ट्रीय एनएमएमएस अर्थात ’नॅशनल-मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप’साठी पात्र ठरली आहे. भारत सरकारच्या मानव संशोधन विकास मंत्रालयांतर्गत (सध्याचे शिक्षण मंत्रालय) शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने दरवर्षी इयत्ता आठवीमध्ये शिकणार्या अल्प आर्थिक उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते.या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थिनीला प्रतिमाह 1000 रुपये (वार्षिक 12 हजार रुपयांची) शिष्यवृत्ती पुढील सलग चार वर्षे अशी एकूण 48000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजची गतवर्षी इयत्ता आठवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी (सध्या इयत्ता नववी ब वर्गात प्रविष्ट) तनया ऋषिकेश म्हात्रे या विद्यार्थिनीला 76 प्रतिशत गुण प्राप्त झाले असून तिची एनएमएमएस या शिष्यवृत्तीच्या लाभार्थी यादीत निवड झाली आहे. एनएमएमएस ह्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची यशस्वी कामगिरी राहिली आहे. तनया हीने विद्यालयाच्या यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. तनयाच्या यशाबद्दल विद्यालयाचे आधारस्तंभ व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी तसेच विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्यद्वय प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, ’रयत’च्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, पर्यवेक्षक दीपक भर्णुके आदींनी तनया म्हात्रे हिचे कौतुक व अभिनंदन केले. तनया हिला मार्गदर्शन करणार्या सर्व शिक्षकांचे, विशेषतः विद्यालयाच्या एनएमएमएस शिष्यवृत्ती विभागाच्या प्रमुख वृषाली म्हात्रे व सहायक रवींद्र भोईर यांचेही सर्वत्र अभिनंदन होत आहे.