Breaking News

मँचेस्टर सिटीने विजेतेपद राखले

लीग चषक फुटबॉल स्पर्धेत चेल्सीला नमवले

लंडन : वृत्तसंस्था

मँचेस्टर सिटीने चेल्सीचा पेनल्टी-शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करत लीग चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडेच कायम राखले, मात्र या सामन्याला चेल्सीचे प्रशिक्षक मॉरिझियो सारी आणि गोलरक्षक केपा अरिझाबालागा यांच्यातील वादाचे गालबोट लागले.

मँचेस्टर सिटीचा गोलरक्षक एडरसन याने शूटआऊटमध्ये जॉर्गिन्हो आणि डेव्हिड लुइस यांची पेनल्टी वाचवली; तर रहीम स्टर्लिग याने केपाला चकवत गोलाची नोंद करून सिटीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दोन आठवड्यांपूर्वी चेल्सीला इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये मँचेस्टर सिटीकडूनच 0-6 अशा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. 1991नंतरचा चेल्सीचा हा सर्वात मानहानीकारक पराभव ठरला होता. त्यातच सोमवारी (दि. 25) चेल्सीला एफए चषकात मँचेस्टर युनायटेडकडून पराभूत व्हावे लागल्यामुळे सारी यांचे प्रशिक्षकपद धोक्यात आले आहे. सारी यांनी या सामन्यासाठी सावध पवित्रा घेत गोंझालो हिग्यूएनला विश्रांती देत इडेन हझार्डला सुरुवातीला उतरवले होते.

पहिल्या सत्रातच मँचेस्टर सिटीच्या सर्जियो अ‍ॅग्युरोला गोल करण्याच्या संधी मिळाल्या होत्या, मात्र त्याला या संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. विन्सेंट कोम्पानी याला दुखाापतीमुळे बाहेर जावे लागल्याने सिटीला मोठा धक्का बसला. चेल्सीने दुसर्‍या सत्रात सिटीला प्रत्युत्तर दिले, पण सिटीनेच संपूर्ण वेळ सामन्यावर नियंत्रण मिळवले. निर्धारित वेळेत एकही गोल न झाल्याने अतिरिक्त 30 मिनिटांच्या खेळातही दोन्ही संघांच्या एकाही खेळाडूला गोल करता आला नाही. त्याआधी अरिझाबालागा याने लेरॉय सेनची स्पॉट-किक अडवत सिटीला आघाडी घेण्यापासून रोखले होते. शूटआऊटमध्ये सिटीकडून इकाय गुंडोजान, सर्जियो अ‍ॅग्युरो, बर्नाडो सिल्वा आणि रहीम स्टर्लिग यांनी गोल केले; तर लेरॉय सेनची पेनल्टी अडवण्यात आली. चेल्सीकडून सेसार अझपिलीक्यूएटा, एमरसन पाल्मिएरी, ईडेन हझार्ड यांनी गोल केले; तर जॉर्गिन्हो आणि डेव्हिड लुइझ यांनी गोल करण्यात अपयश आले.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply