महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे आवाहन
पनवेल : रामप्रहर वृत्त
केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत महाराष्ट्र राज्यात 26 नोव्हेंबर 2019पासून सातवी आर्थिक गणना-2019 सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही आर्थिक गणनेचे काम सुरू झाले आहे. घरोघरी कुटुंबांना व उद्योजकांना भेटी देऊन उद्योग, व्यवसाय आणि सेवा यांची गणना करण्यात येत आहे. यासाठी सामाईक सेवा केंद्राच्या वतीने पर्यवेक्षक व प्रगणक यांची नेमणूक केली आहे. तरी या आर्थिक गणनेचे प्रमुख उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योजक व नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी केले आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी महापालिका क्षेत्रातील खारघर, कामोठे, कळंबोली व पनवेल या चार प्रभाग अधिकार्यांची बैठक घेऊन या आर्थिक गणनेसाठी संपूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पर्यवेक्षक व प्रगणकांना आर्थिक गणना करताना काही अडचणी आल्यास त्यांनी सांख्यिकी विभाग, पनवेल महानगरपालिका मुख्यालय यांच्याशी संपर्क साधावा. आर्थिक गणना विभागीय व्यवस्थापक (कोकण विभाग) सुयोग के. दीक्षित यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल व उपमहापौर जगदिश गायकवाड तसेच उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची सदिच्छा भेट घेऊन आर्थिक गणना कशा प्रकारे केली जाते याची माहिती दिली. पनवेल महानगरपालिका क्षेत्राची आर्थिक गणना करण्यासाठी नकाशाप्रमाणे 44 गट स्थापन करण्यात आले असून, याकामी 44 पर्यवेक्षक आणि 200 प्रगणकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती दीक्षित यांनी या वेळी दिली.
जिल्हास्तरीय समिती गठीत
केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत दर पाच वर्षाला संपूर्ण देशात आर्थिक गणना केली जाते. हे काम करण्याकरीता केंद्र शासनाने अंमलबजावणी यंत्रणा म्हणून सामाईक सेवा केंद्राची नियुक्ती केली आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे.