कर्जत : बातमीदार
हल्ली गावात, समाजात सर्रास गटतट पडून भांडण-तंटे होत असतात. आदिवासी वाड्यांमध्ये तर हे प्रमाण अधिक असते, पण कर्जत तालुक्यातील एक, दोन नाही तर तब्बल नऊ आदिवासी वाड्या एकत्र येत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत.
शेलू ग्रामपंचायत हद्दीतील बेडीसगाव अंतर्गत तब्बल 16 आदिवासी वाड्या आहेत. दररोज कष्ट करून पोट भरणारा हा वर्ग. त्यामुळे सर्वांची आर्थिक स्थिती बेताचीच. मंगळ दरवडा यांनी आदिवासींना एकत्र करीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. प्रत्येक कुटुंबाने घरटी 10 रुपये वर्गणी काढण्याचे ठरले आणि 2004मध्ये एक गाव एक गणपती अशी संकल्पना समोर आली.
पुढे बेडीसगावमधील नऊ आदिवासी वाड्या मिळून एक गणपती अशी संकल्पना उदयास आली. शाळेची वाडीतील समाज मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला आणि शाळेचीवाडी, कुंदवाडी, आंबेवाडी, कोथाचीवाडी, बोरीचीवाडी, गावठाण वाडी, वाघिणीची वाडी यांनी एकत्रित मिळून हा उत्सव सुरू केला आहे. नऊ आदिवासी वाड्यांतील साधारणत: 500 कुटुंबांनी एकत्र येऊन एक गणपती आणण्याचे हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असेल. येथील गणेशोत्सवात आरती, जागर भजन, नृत्य, भारूड, यांची सलग दहा दिवस रेलचेल असते. गेली 18 वर्षे ही परंपरा टिकून आहे.
बेडीसगावमधील नऊ आदिवासी वाड्यांनी एकत्र येत गुण्यागोविंदाने गणेशोत्सव साजरा करीत आहेत. मागील काही महिने रस्त्याच्या प्रश्नावरून स्थानिकांत वाद होते, परंतु गणेशोत्सव काळात पोलिसांना तेथे कोणतेही काम लागत नाही. बाप्पाची ही किमया म्हणावी लागेल. आम्ही ही अनेक वाड्या एकत्र येत गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना जिल्हा पोलिसांपुढे मांडणार आहोत.
-राजेंद्र तेंडुलकर, पोलीस निरीक्षक, नेरळ