…म्हणून शिवसेनेने सुरक्षित अंतर राखले -चंद्रकांत पाटील
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. राऊत यांची भाषा राजकीय सभ्यतेत बसणारी नव्हती. याचसाठी शिवसेनेने राऊतांपासून सुरक्षित अंतर राखले असावे, असे या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
शिवसेना भवनात राऊतांचा हा एकपात्री प्रयोग झाला, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. ‘आरोप झाले, तर निर्दोषत्व सिद्ध करण्याचे अनेक घटनादत्त अधिकार आणि मार्ग आहेत. ते राहिले बाजूला, आरोप करणार्याचं अतिशय असभ्य भाषेत चारित्र्यहनन करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता.
मागील दोन तीन दिवस मोठी गोष्ट बाहेर काढणार असल्याचा कांगावा संजय राऊत यांनी केला. जगात आजपर्यंत कोणाची पत्रकार परिषद झालीच नाही, यांचीच पहिल्यांदा होत आहे, असे हे वागत होते. या सर्वातून शेवटी ’खोदा पहाड निकला चुहा’ असे सिद्ध झाले. इतरांविषयी बोलताना अपशब्दांचा वापर करणे ही यांची संस्कृतीच आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, असे म्हणणेच धाडसाचे ठरेल. कारण पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण होते, ते इथे नव्हतेच. त्यामुळे हा एकपात्री प्रयोग बघणार्यांची चांगलीच करमणूक झाली असेल, असे म्हणतो. राजकारणात गती असलेल्यांच्या तर पोटात हसून हसून मुरडा आला असावा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणांकडून ज्यांची चौकशी झाली, त्यांचे अरण्यरूदन असा हा प्रकार होता. प्रयोग आणखी ’नबाबी’ होण्यासाठी तुम्ही मित्रांची मदत घ्यायला हवी होती. कदाचित, नाशिकसारख्या दूरच्या ठिकाणांहून माणसे जमवता-जमवता ही जमवा-जमव जमली नसावी. असो. संजय राऊत गेट वेल सून!, असा खोचक टोल चंद्रकांत पाटील यांनी लगावला. शिवसेना भवनात राऊतांचा हा एकपात्री प्रयोग झाला, यापलीकडे यात शिवसेना कुठेच नव्हती. त्यामुळे राऊत मध्ये-मध्ये बाळासाहेब, शिवसेनेचेनाव ओढून-ताणून घेत होते. उद्धवजी तर दूरच, पण ज्या आदित्य ठाकरेंना पर्यावरणाचा हवाला देत प्रकल्पावर कारवाई करायला राऊतांनी सांगितले तेही तिथे नसावे?, असेही पाटील म्हणाले.
ज्या पद्धतीने आमदारांनी, खासदारांनी, नेत्यांनी पाठ फिरवली. मुंबई शिवसेनेचा बेस असताना नाशिकहून गाड्या करून निघाले, पोहोचले अशा प्रकारचा इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला. त्यातून हे तोंडावर आपटले. शिवसैनिकांना असा आक्रस्ताळेपणाने वागणे आणि काँग्रेस राष्ट्रवादीसमोर भरकटत जाणे हे आवडलेले नाही. राऊतांनी केलेल आरोपात काडिमात्र तथ्य नाही.
-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
संजय राऊतांची पत्रकार परिषद म्हणजे ड्रामा शो झाली असून खोदा पहाड निकला चुहा अशाची होती. राऊतांची पत्रकार परिषद हा फुसक्या पेक्षाही फुसका बार निघाला हे जनतेनी पाहले. त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. त्यांनी ज्या पद्धतीने शब्द वापरले त्यावरून त्यांची मानसिकता समजते. एखादा व्यक्ती जेव्हा बिथरतो, घाबरतो तेव्हा तो अशाप्रकारचे शब्द वापरतो. त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन मानसिक उपचार करून घ्यावा.
-प्रसाद लाड, आमदार, भाजप