Breaking News

पर्यटन एक निखळ आनंद…

धकाधकीच्या जीवनात दोन-चार दिवस कुटुंबीयांसमवेत पर्यटनाचा आनंद लुटायचा असेल तर कोकणासारखे उत्तम ठिकाण नाही. निळाशार समुद्र, हिरवीगार झाडी आणि माफक दरात मिळणारे ताजे, चमचमीत भोजन आदींमुळे हा छोटासा प्रवास नेहमीच लक्षात राहण्यासारखाच ठरतो. रायगडातही अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे दोन दिवसांत मनमुरादपणे आनंद लुटणे सहज शक्य होणार आहे.

अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या तिन्ही तालुक्यांना समुद्र लाभलेला आहे. या तिन्ही तालुक्यांतही अनेक पर्यटनस्थळे नेहमीच पर्यटकांना खुणावत आलेली आहेत. मुंबई, पुणे, ठाण्यात राहणार्‍या पर्यटकांना अलिबाग, मुरूड ही ठिकाणे सोयीची वाटतात. स्वाभाविकच आहे एक-दोन दिवसांची मस्त ट्रीप करून निखळ आनंद उपभोगता येतो. अलिबाग, मुरूडला सातत्याने पर्यटकांची गर्दी असते. त्या प्रमाणात श्रीवर्धनला पर्यटकांचा ओघ कमी जाणवतो. कारण हे ठिकाण मुंबई, पुण्यापासून खूप लांब आहे. मुंबई ते श्रीवर्धन हे रस्ता मार्गाने 178 किमी, तर पुणे-श्रीवर्धन अंतर 157 किमी इतके आहे. या दोन्ही ठिकाणांहून येताना पर्यटकांची मोठी दमछाकच होते. त्यात आपल्याकडील रस्ते म्हणजे दिव्यच. सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असली तरी एकूणच रस्त्यांची दुरवस्था असल्याने पर्यटकांच्या नाकी दम आल्याशिवाय राहत नाही, पण आता कोकणामध्ये जलवाहतुकीला प्राधान्य मिळत असल्याचे आशादायी चित्र दिसू लागले आहे.

आगरदांडा ते दिघी हा जलप्रवास खूपच आनंददायी असाच आहे. समुद्राच्या उसळणार्‍या लाटा, त्यांचा होणारा आवाज सारं काही मन प्रसन्न करून जाते. दिघीच्या जेट्टीवर उतरले की तिथून अवघ्या 15 किमी अंतरावर दिवेआगर हे रमणीय ठिकाण लागते. सोन्याच्या गणेशमूर्तीमुळे  दिवेआगर नावारूपास आले आहे, पण चार वर्षांपूर्वी येथील सोन्याच्या गणेशमूर्तीची चोरी झाली आणि या तीर्थक्षेत्राला अवकळाच आली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. ग्रामस्थांनी ट्रस्ट स्थापन करून या मंदिराची चिरेखाणी दगडात सुंदर अशी उभारणी केली आहे. तांबड्या भडक रंगातील चिरेखाणी दगडाचे बांधकाम निश्चितच नजरेत भरणारे असेच आहे. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पर्यटक आले तरच परिसर फुलतो, अन्यथा कमालीची शांतता या भागात जाणवते. तीर्थस्थळांमुळे स्थानिकांनाही काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. माफक दरात शुद्ध शाकाहारी भोजन तसेच ताज्या मच्छीचे सुग्रास जेवण आवडीनुसार मिळते. अस्सल ग्रामीण भाग असल्याने येथे राहताना आपणदेखील ग्रामीण भागातच राहिल्याचा सुखद आनंद मिळतो, हे विशेष.

दिवेआगरचा समुद्रदेखील असाच नितळ आणि स्वच्छ आहे. गर्दीपासून काहीसा दूर राहिलेल्या या किनार्‍याकडे आता प्रवाशांची पावले दिवेआगरकडे वळू लागली आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आता स्थानिकांनीही बोटिंगची सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे, मात्र शनिवार, रविवार अथवा दिवाळी, मे महिन्यातील सुटी सोडली तर अन्य वेळेला मात्र येथे पर्यटकांची गर्दी तशी तुरळकच राहते. याचा फटका स्थानिकांना मोठ्या प्रमाणात बसतो हे नाकारून चालणार नाही.

दिवेआगर ते श्रीवर्धन हे अंतर 18 किमी आहे. शेखाडीमार्गे गेल्यास विस्तीर्ण समुद्राचे विलोभनीय दृष्य नजरेत पडल्याशिवाय राहत नाही, पण हा मार्ग खूपच खडतर आहे. त्यामुळे अनेक जण या मार्गाचा फारसा वापर करताना दिसत नाहीत.त्याऐवजी बोर्लीमार्गे श्रीवर्धनला जाणे पसंत करतात. शेखाडी मार्ग जर चांगल्या प्रकारे तयार झाला, तर निश्चितच पर्यटक या मार्गाला पसंती दर्शवतील.

श्रीवर्धन बहरतोय

श्रीवर्धनही आता चांगले बहरू लागले आहे.नगरपालिका, पंचायत समितीसह तहसील कार्यालये असल्याने या परिसराचा विकास सातत्याने होऊ लागला आहे. श्रीवर्धनला ऐतिहासिक महत्त्वदेखील आहे. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे हे जन्मठिकाण. पेशव्यांचे जन्मठिकाण म्हणून या नगरीकडे मोठ्या अभिमानाने पाहिले जाते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्रीमंत पेशवे यांचे स्मारक आहे, पण या स्मारकाची सध्या दुरवस्था झाली आहे. विद्यमान सरकारने स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी कार्यवाही सुरू केली आहे. ते काम पूर्ण झाले तर निश्चितच पर्यटकांसाठी ते एक चांगले पर्यटनस्थळ ठरू शकेल. याशिवाय श्रीवर्धनचा समुद्रकिनारादेखील नजरेत भरणारा असाच आहे. गेल्या काही वर्षांत या किनार्‍याच्या सुशोभिकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत राहिल्याने हा किनारा आता निश्चितच पर्यटकांना आकर्षित करत आहे. येथे पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल्स, फार्महाऊसेसही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहेत.

श्रीक्षेत्र हरिहरेश्वर

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यातील शेवटचे टोक म्हणून ओळखले जाते. कारण येथून पुढे बाणकोट खाडीतून मंडणगड तालुक्यात जाणे शक्य होते. त्यासाठीही डॉ. मोकल यांच्या सुवर्णदुर्ग शिपिंग कंपनीने रो रो सेवा सुरू केली आहे. हरिहरेश्वरला विविध धार्मिक कार्याच्या निमित्ताने पर्यटक, भाविकांची सतत वर्दळ सुरू असते. अतिशय शांत असे हे ठिकाण आहे.एखादा दिवस शांततेत घालविण्यासाठी उत्तम स्थळ म्हणूनदेखील या क्षेत्राकडे पाहिले पाहिजे. या परिसरात आता घरगुती राहण्याची उत्तम सोय होऊ लागली आहे. माफक दरात राहणे, भोजनाची सोय यामुळे पर्यटक या क्षेत्राला पसंती देत आहेत. मनसोक्त समुद्र स्नान करून कालभैरव, हरेश्वराचे मनोभावे दर्शन घेत शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. देवस्थानच्या वतीने आता भक्तनिवासाचीही सोय करण्यात आली आहे.त्यासाठी एका खोलीला 500  रुपये असे दर आकारले जातात. त्यामध्ये टॉयलेट, आंघोळीसाठी गार, गरम पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंदिर परिसर असल्याने मद्यप्राशनास पूर्णपणे बंदी आहे. हरिहरेश्वरच्या आसपास चार-पाच ठिकाणे फिरण्यासाठी उपलब्ध असल्याने त्याचाही मनमुराद आनंद लुटणे शक्य होते.हे करीत असताना समुद्राच्या पाण्याशी मस्ती करण्याचे नसते साहस कुणीही करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पर्यटन हे एक निखळ आनंद मिळविण्यासाठी करायचे असते. याचे भान प्रत्येकाने ठेवले, तर निश्चितच आपला सर्वांचा प्रवास सुखकर आणि स्मरणात राहिल्याशिवाय राहणार नाही.

शुभं भवतू.

डॉ. चंद्रकांत मोकलांचे प्रयत्न

 विशेषकरून ज्या ज्या ठिकाणी छोट्या छोट्या खाड्या आहेत, त्या खाड्यांमधून रो रो सेवा सुरू झाली आहे. याचा फायदा पर्यटकांसह स्थानिकांनाही चांगल्या प्रकारे होऊन पर्यटनवाढीला चालना मिळू लागली आहे. या रो रो सेवेचा प्रयत्न दापोलीचे माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांनी 15-20 वर्षांपूर्वी सुरू केला. त्यासाठी त्यांना सरकार दरबारी खूप झगडावेही लागले, पण डॉक्टरांनी पाठपुरावा सोडला नाही. कोकणच्या विकासाचे एक स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. ते साकारण्यासाठी जलप्रवास हा मार्ग त्यांनी निवडून तो यशस्वीही करून दाखविला. आज त्यांच्या सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस कंपनीच्या माध्यमातून त्यांनी दाभोळ ते धोपावे (2003), वेश्वी-बागमांडला (2005), जयगड-तवसाळ (2009), आगरदांडा ते दिघी (2012) अशी फेरी बोट सेवा सुरू केली. आज या चारही फेरी बोटींना स्थानिकांसह पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. चंद्रकांत मोकल यांचे पुत्र डॉ. योगेश मोकल हे सध्या हा व्यवसाय पाहत आहेत. सरकारने सहकार्य केले तर कोकणात आणखी रो रो सेवा सुरू करण्याचा मानसही डॉ. योगेश मोकल यांनी व्यक्त केला आहे.

आगरदांडा ते दिघी जलप्रवास

आगरदांडा ते दिघी हे जलमार्गाने अवघे तीन किमीचे अंतर आहे. त्यासाठी फेरी बोटीने अवघ्या 15 मिनिटांचा कालावधी लागतो. यासाठी प्रथम मुरूडला यावे लागेल. मुरूड ते आगरदांडा हे अंतर 11 किमी आहे. तेथून दर अर्ध्या तासाला ही फेरी बोट सेवा रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असते. विशेष म्हणजे या फेरी बोटीतून प्रवासी बसेस, ट्रक, छोट्या कार, जीप, टू व्हीलर यांचीही वाहतूक करता येते. त्यासाठी माफक दरही आकारले जातात. प्रवाशांसाठी अवघे 20 रुपये आकारले जातात. 15 मिनिटांचा हा जलप्रवास पर्यटकांना निश्चितच आनंद देणारा ठरतो. वाहनांची ने-आण करण्यासाठी आता मेरीटाईम बोर्डाने जेट्टी बांधल्या आहेत. त्यामुळे बोटीत वाहने घेऊन जाणे सुलभ होऊ लागले आहे. ज्यांच्याकडे स्वतःची वाहने नाहीत, त्यांना मुरूड येथून सितारा रिक्षाद्वारे जेट्टीवर जाणे शक्य होते.

-अतुल गुळवणी (9270925201)

Check Also

लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता …

Leave a Reply