अलिबाग : प्रतिनिधी
वातावरणात होत असलेल्या बदलाचा भातपिकावर परिणाम होत आहे. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी भातपिकावर पिवळा खोडकिडा, सुरळीतील अळी व निळे भुंगिरे यांचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरुवात झाली आहे.
जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला, मात्र जुलै महिन्यात पावासाने कसर भरून काढली. ऑगस्ट महिन्यातही चांगल्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे भातपीक जोमाने आले, शेती बहरली आहे. त्यामुळे यंदा चांगल्या उत्पादनाची आशा शेतकर्यांना आहे, पण गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावासने विश्रांती घेतली असून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे काही भागात किडरोगाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकर्यांना तातडीने किडरोग व्यवस्थापन सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.
सुरळीतील अळी कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करते व त्याची सुरळी करून त्यात राहते. रात्रीच्या वेळी अळी पानातील हरितद्रव्य खरवडून खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. त्यावर कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करावी.
या काळात भातपिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. खोडकिडीची अळी प्रथम कोवळ्या पानावर उपजीविका करते आणि नंतर खोडामध्ये शिरून आतील भाग खाण्यास सुरुवात करते. त्यामुळे रोपाचा मधला भाग वरून खाली सुकत येतो. यालाच गाभामर असे म्हणतात. लावणीनंतर शेतात पाच टक्के कीडग्रस्त फुटवे आढळून आल्यास किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक अंडीपुंज आढळून आल्यास उपाययोजना कराव्यात. निळ्या मुंगेराचा प्रादुर्भाव भात खाचरामधील सखल भागात ज्या ठिकाणी पाणी साचते अशा जागेवर होतो. त्यामुळे अशा सकल भागांची शेतकरी बांधवांनी वेळोवेळी पाहणी करावी. आणि कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करावी.
ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणार्या पावसामुळे भातपिकावर विशेषतः सुवर्णा भात जातीवर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. रोगामुळे मुस्वातीला पानावर ठिपके दिसून येतात व पिकाच्या वाढीसोबत ठिपक्यांचे आकारमान वाढून पानांवर असंख्य ठिपके निर्माण होऊन पाने करपून रोपांची वाढ खुंटते. त्याचबरोबर लष्करी अळी व तपकरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठीदेखील योग्य उपाययोजना कराव्यात, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शेतकर्यांनी वातावरणातील बदल व किडींचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीडनिहाय व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात आणि आपल्या भातपिकाचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळावे.
-उज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी