Breaking News

केणी कुटुंबीयांनी साकारला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव शिंदे-फडणवीस सरकारकडून नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यावर विमानतळ नामकरणावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्याचे प्रतिबिंब गणेशोत्सवात उमटल्याचे दिसून येते. पनवेलजवळील चिंचपाडा येथे केणी कुटुंबीयांनी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा साकारला आहे.
चिंचपाडा गावातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहणारे वडघर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य स्व. विठ्ठल कान्हा केणी हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या विविध आंदोलनांमध्ये ग्रामस्थांसह सहभागी झाले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचा पुतण्या व युवा कार्यकर्ते विजय केणीदेखील सक्रिय असतात. सध्या गणेशोत्सव सुरू असून विजय केणी यांनी ग्रामस्थ व केपी ग्रुपच्या सहकार्याने घरगुती गणेशाची आरास लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा उभारून केली आहे.
या संदर्भात माहिती देताना विजय केणी यांनी सांगितले की, पनवेल, रायगड, नवी मुंबईसह ठाणे, पालघर, मुंबईतील बहुजन समाज जमिनी जाऊनही आपल्या भूमीवर राहताना दिसतोय ते केवळ लोकनेते दि. बा. पाटील यांच्यामुळेच. साडेबारा टक्के विकसित भूखंड तत्त्व ‘दिबां’नी त्या वेळच्या सरकारला मान्य करण्यास भाग पाडले. नाही तर आज इथला प्रकल्पग्रस्त दूर कुठेतरी फेकला गेला असता. आज भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त ताठ मानेने जगत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये ‘दिबां’बद्दल विशेष आदर असून नवी मुंबई विमानतळाला त्यांचेच नाव देण्यासाठी समस्त लोक एकवटले होते.
राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यानंतर हा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल व तोही मंजूर होईल, असा विश्वासही केणी यांनी व्यक्त केला.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply