Breaking News

रायगडात फुलपाखरांच्या 147 रंगीबेरंगी प्रजातींची अनोखी दुनिया

पाली : प्रतिनिधी
पश्चिम घाटाचा मोठा पट्टा, मुबलक झाडेझुडपे व निसर्गसंपदा, पोषक वातावरण, विस्तीर्ण समुद्र किनारा, कांदळवने व अभयारण्य या सर्वांगीण अनुकूल परिस्थितीमुळे रायगड जिल्ह्यात रंगेबिरंगी फुलपाखरांचे नंदनवन फुलले आहे. सध्या ठिकठिकाणी रंगीबेरंगी फुलपाखरे उडताना व बागडताना पहावयास मिळत आहेत. फुलपाखरांच्या तब्बल 147 प्रजाती जिल्ह्यात आढळतात. याशिवाय ब्ल्यू मॉरमॉन हे राज्य फुलपाखरू व पश्चिम घाटामधील सर्वांत मोठे व दुर्मिळ सदर्न बर्ड विंग फुलपाखरू जिल्ह्यात आढळते.
देशात 1 ते 30 सप्टेंबरदरम्यान तिसरा फुलपाखरू महोत्सव सुरू आहे. या संदर्भात अलिबाग येथील निसर्ग, फुलपाखरू व प्राणीपक्षी अभ्यासक प्रवीण कवळे यांनी सांगितले की जगात फुलपाखरांच्या सुमारे 17,500 जाती आहेत. भारतात फुलपाखरांच्या सुमारे 1500 जाती, तर महाराष्ट्रात सुमारे 345 जाती आढळून येतात. त्यातील तब्बल 147 प्रजाती एकट्या रायगड जिल्ह्यात आढळून येतात. यामध्ये प्रामुख्याने ग्रेट एगफ्लाय, रथिंडा आमोर, युप्लॉईया कोर, कॉमन मॉरमॉन, कॉमन लियोपार्ड, कॉमन पियरोट अशा विविध प्रकारच्या प्रजातींचा समावेश आहे.
फुलपाखरांचे फूड प्लांट येथे आढळतात. त्यास होस्ट प्लांट असेही म्हणतात. प्रत्येक जातीच्या फुलपाखरांचे होस्ट प्लांट ठरलेले असते. फुलपाखराची मादी ही मिलनानंतर लगेचच तिला हवे असलेले झाड शोधते व त्यावर अंडी घालते. त्यामध्ये कडूनिंब, कढीपत्ता, सीताफळ, रामफळ, लिंबू, कदंब, अशोक अशी झाडे येतात. सोनटक्का, पानफुटी अशा छोट्या झाडांवरही ग्रास डीमन, रेड पियरो अशी सुंदर फुलपाखरे वाढतात, असे कवळे यांनी सांगितले, मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी तणनाशकांच्या वापराचे प्रमाण फुलपाखरांच्या अळ्या, सुरवंट व फुलपाखरांना धोकादायक ठरत आहेत, असेही कवळे म्हणाले.
होस्ट प्लांटला मागणी
अलिबाग तालुक्यातील तीनविरा धरणाजवळ खास फुलपाखरांसाठी खाजगी उद्यान केले गेले आहे तसेच फुलपाखरांचे होस्ट प्लांट असलेल्या झाडांना सध्या अधिक मागणी आहे. लोक आपल्या परसबागेत किंवा खास छोटे उद्यान करून तेथे ही झाडे लावतात व फुलपाखरांना आकर्षित करतात. बच्चे कंपनीदेखील रंगेबिरंगी फुलपाखरांच्या निरीक्षणाचा आनंद लुटले, असे पालीतील ग्रीनटच नर्सरीचे मालक अमित निंबाळकर यांनी सांगितले.

पोषक वातावरण, निसर्गसंपदा यामुळे जिल्ह्यात फुलपाखरांच्या विविध प्रजाती आढळतात. आपल्या घराशेजारील परसबागेत विविध फुलपाखरे यावीत म्हणून अनेकजण होस्ट प्लांट लावतात. शिवाय पपई, पेरू अशी पिकलेली फळे किंवा सडका बांगडा मासा आपल्या घराच्या अंगणात ठेवून फुलपाखरांना आकर्षित करता येते.
-शंतनू कुवेस्कर, प्राणीपक्षी अभ्यासक, माणगाव

काही दिवसांपूर्वी माणगाव तालुक्यातील पाटणूसजवळ माळरानावर एका छोट्या झाडावर कॅबेज व्हाईट या जातीची असंख्य फुलपाखरे अंडी देताना जमलेली दिसली. जिल्ह्यात फुलपाखरांसाठी पोषक पर्यावरण
आहे. जिल्ह्यातील फुलपाखरांचे संवर्धन झाले पाहिजे तसेच या फुलपाखरांची माहिती विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे.
-राम मुंढे, निसर्ग व पक्षी अभ्यासक, विळे-माणगाव

पश्चिम घाटाचा बहुसंख्य भाग आणि अनुकूल निसर्ग यामुळे जिल्ह्यात फुलपाखरांच्या विविध प्रजाती आढळतात. कांदळवनातदेखील फुलपाखरे दिसतात. या फुलपाखरांच्या अधिवसाचे संवर्धन होणे आवश्यक आहे.
-समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन, अलिबाग

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply