Breaking News

मराठी तितुका मेळवावा

जगभरातील मराठीजनांनी एकत्र येऊन मराठी भाषेची गोडी वाढवावी या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी विश्व संमेलनाचे बुधवारी शानदार उद्घाटन झाले. ‘मराठी तितुका मेळवावा’ या आशयाखाली तीन दिवस चालणार्‍या या संमेलनात मराठी भाषा, संस्कृती, परंपरांचा वैश्विक गजर होत आहे. आपल्यासाठी ही अभिमानास्पद बाब म्हटली पाहिजे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी…, एवढ्या जगात माय मानतो… कवी सुरेश भट यांची ही रचना वाचली, ऐकली की तमाम मराठीजनांचा ऊर अभिमानाने भरून येतो. मराठी भाषा मुळी आहेच सुंदर आणि तितकीच गोड. आपल्या या मराठी भाषेचा सर्वांगीण प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी तसेच मराठीतून संवाद करण्याची रूची निर्माण करण्यासाठी, दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याकरिता राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आणि सांस्कृतिक कार्य व उद्योग विभागाच्या सहकार्याने विश्व मराठी संमेलन मुंबईतील वरळी येथे आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठमोळ्या पद्धतीने झाले. विशेष बाब म्हणजे जगाच्या पाठीवरील प्रत्येक खंडातील, विविध देशांमधील आणि देशाच्या विविध राज्यांतील सुमारे 1500 मराठी बंधू-भगिनी या संमेलनासाठी आवर्जून उपस्थित राहिलेे. संमेलनाच्या तीनही दिवशी भरगच्च कार्यक्रमांची पर्वणी आहे. यामध्ये चर्चासत्रे, परिसंवाद, परदेशातील मराठी जनांचे अनुभवकथन, ग्रंथ प्रदर्शन यासह सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, लावणी, लोकसंगीत, लेझीम, ढोल, ताशांसारखे मराठी पारंपरिक खेळ, वाद्यमहोत्सव यांचाही समावेश आहे. मराठी साहित्य, कला, संगीत या सर्व सांस्कृतिक अंगांचा परामर्ष घेणे हाही संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे. या संमेलनाच्या निमित्ताने विविध उद्योग महाराष्ट्रामध्ये यावेत याकरिता गुंतवणूकदार व उद्योजक यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी 6 जानेवारी रोजी महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे मराठी उद्योजक व गुंतवणूकदार यांचा परस्पर संवाद सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. एकूणच तीन दिवस मराठीजनांसाठी पर्वणी आहे. मंडळी, मराठी माणसांना या भाषेची थोरवी माहीतच आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी, माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन॥ अशा शब्दांत मराठीचे वर्णन केले आहे. मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लेखक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच सर्वांचे लाडके कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. मराठी संदेशांचा समाजमाध्यमांवर पूर येतो. एरवी मात्र मराठीबाबत नागरिकांमध्ये निरूत्साह असतो. तो असा की अनेकदा मराठी लोक अकारण इतर भाषांतून संभाषण करतात. जिथे गरज आहे तिथे ती ती भाषा जरुर वापरली पाहिजे, पण जिथे मराठी बहुसंख्येने बोलली जाते तिथे याच भाषेचा आग्रह धरला पाहिजे. या संमेलनाच्या माध्यमातून सक्षम, संपन्न आणि समृद्ध वैश्विक मराठी प्रतिमा निर्माण करण्यासाठी वैश्विक मराठी व्यासपीठ मिळेल तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यास मदत होईल अशी आशा करूया!

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply