पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यासाठी व रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाबाबत बुधवारी (दि. 21) सिडकोने कोणतेही लेखी आश्वासन न दिल्याने हा उड्डाणपूल खड्डेमुक्त करण्याकरिता भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता पूलावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष व भाजप पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे.
नवीन पनवेल-माथेरान महामार्गाला जोडणार्या या उड्डाणपुलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे, वाड्या, पाडे जोडले गेले असून दळणवळणाचा हा प्रमुख मार्ग आहे. या उड्डाणपुलाची पावसामुळे दूरवस्था झाली आहे. या परिसरातील शाळेत जाणारे हजारो विद्यार्थी, नोकरदार महिला व पुरुष, ज्येष्ठ नागरिक, लहान मोठे व्यावसायिक व ग्रामीण भागातून रानभाज्या, फळे-फुले विक्रीसाठी घेऊन येणार्यांना येथून जाताना त्रास सहन करावा लागतो आहे. येथील खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहेत, तर काहींना कायमचे जायबंदी व्हावे लागत आहे.
या उड्डाणपुलावरील रहदारीचा विचार करता पुलाच्या उतारावरील दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रिटीकरण होणे गरजेचे असताना सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत तक्रार केल्यावर सिडकोकडून पावसाळ्यात खड्डे तात्पुरते पेव्हर ब्लॉकने बुजविले जातात, मात्र त्यामुळे भीक नको, पण कुत्रा आवर म्हणण्याची वेळ येते.
गुरुवारचा रास्ता रोको रद्द करण्यासाठी सिडकोच्या अधिकार्यांनी भाजप पदाधिकार्यांजवळ संपर्क साधला होता, पण त्यांनी रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाबाबत कोणतेही लेखी आश्वासन न दिल्याने गुरुवारी सकाळी 11 वाजता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उड्डाणपुलावरील वाहतूक रोखून धरणार असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले असून, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …