Breaking News

दुष्काळापाठोपाठ भाववाढ?

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारच्या कार्यकाळात शेतीमालाचे भाव बर्‍यापैकी आटोक्यातच राहिले आहेत. विशेषत: सप्टेंबर 2016 पासून मार्च 2019पर्यंत यात फार मोठी भाववाढ न दिसल्याचे या विषयातील जाणकार नमूद करतात.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले. या मतदानासोबत लोकसभेच्या 543पैकी जवळपास 89 टक्के मतदारसंघातील मतदान पूर्ण झाले असून, सातव्या अर्थात अखेरच्या टप्प्यातील मतदान 19 तारखेला पार पडेल. यात उर्वरित 59 जागांवर मतदान होईल. त्यानंतर 23 मे रोजी  मतमोजणी होऊन निवडणुकांचे निकाल जाहीर होतील आणि पाठोपाठ नव्या सरकारची स्थापना होईल. निकालाचा कौल कुणाच्या बाजूने लागेल याविषयी तूर्तास निरनिराळे दावे-प्रतिदावे केले जात असले तरी निकाल लागेपर्यंत नेमकेपणाने त्याविषयी बोलणे उचित ठरणार नाही. मात्र, आतापासून स्पष्ट दिसणारी एकच गोष्ट आहे आणि ती ही की, कुठलेही सरकार स्थापन होवो, त्या सरकारला प्रथम देशातील दुष्काळसदृश परिस्थितीचा व पर्यायाने शेतीमालाच्या भाववाढीचा सामना करावा लागणार आहे. परंतु देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि कडक उन्हाळ्यामुळे गेले दोन महिने मात्र हलकेहलके शेतमालाचा भाव चढा होऊ लागला आहे. ज्वारी, बाजरी, कापूस, टोमॅटो, कांदा यांचे भाव गेल्या वर्षीच्या याच काळातील भावांपेक्षा गेले दोन महिने चढे राहिले असून गुराढोरांच्या खाद्यघटकांचे भावही वाढू लागल्याने येत्या काही महिन्यांत ग्राहकांना दुधासाठी देखील ज्यादा दाम मोजावे लागणार, हे निश्चित. दुधाला चांगला दाम मिळण्याची शक्यता दिसत नसल्यास शेतकरी पशुखाद्यावरील खर्चाच्या बाबतीत हात आखडता घेतो आणि परिणामी भविष्यात दुधाचा तुटवडा पडण्याची शक्यताही वाढते. तसे झाल्यासही परिणाम दुधाचे भाव वाढण्यातच होतो. देशभरातील या भाववाढीवर सर्वाधिक छाया असणार आहे ती महाराष्ट्रातील दुष्काळाचीच, असे तज्ज्ञ सांगतात. राज्यातील दुष्काळाचा प्रभाव साखरेच्या किंमतीवरही येत्या काही महिन्यांत दिसू लागण्याची शक्यता आहे. राज्यात यंदा उसाच्या लागवडीखालील क्षेत्र मागील वर्षापेक्षा कमी आहे. तसेच पाठोपाठ राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारलाही या आघाडीवर अडचणींना तोंड द्यावे लागेल. गेल्या वर्षी या काळात जळगावच्या बाजारात ज्वारीचा प्रति क्विंटल भाव अवघा 1600 रुपये होता, तो एव्हाना 2750 रुपयांवर पोहोचला आहे. धान्यच नव्हे तर फळांचे आणि भाज्यांचे भावही पावसाळ्याच्या आधी बरेच वधारतील असे सांगितले जातेे. गेल्या वर्षी याच काळात अवघा 580 रुपये प्रतिक्विंटल असलेला टोमॅटो कर्नाटकात आताच 2000 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या 655 रुपये प्रति क्विंटल या भावाच्या तुलनेत कांदा आताच 850 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. या सार्‍या पार्श्वभूमीवर सगळ्यांचेच डोळे नैऋत्य मोसमी पावसाकडे लागले आहेत. येत्या जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हे भाकित खरे ठरले तरच परिस्थिती सहजपणे आटोक्यात आणणे सरकारला शक्य होऊ शकेल.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply