Breaking News

तृतीयपंथीयांचा आत्मसन्मान आणि रोजगारासाठी सरसावले पुणे पोलीस

पुणे ः प्रतिनिधी

तृतीयपंथीयांशी संवाद साधण्यासही आपल्याकडे कोणी धजावत नाही़. ते रस्त्यावरून जाऊ लागले तर बाजूला होऊन त्यांच्यापासून दूर जाणेच सर्व जण हिताचे समजतात़. अशा वेळी त्यांना नोकरीवर ठेवणे हे अवघडच. त्यामुळे त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे, एखादा व्यवसाय करता यावा यासाठी पुणे पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला असून शहरातील तृतीयपंथीयांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करता यावी यासाठी त्यांच्या बैठका घेण्यात आल्या.

तृतीयपंथीयांना कोणी नोकरी देत नाही. त्यामुळे गरीब घरातील मुले हे भीक मागण्याचे काम करतात़. दुकानदार, लोकांकडे टाळ्या वाजून पैसे मागतात. लोकही त्यांनी आपल्यासमोर अधिक वेळ थांबू नये म्हणून त्यांच्या हातावर पैसे टेकवतात, मात्र त्यांच्या जीवनाला स्थिरता मिळत नाही़. हे लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी तृतीयपंथीयांच्या आत्मसन्मानासाठी काय करता येईल यासाठी बुधवार पेठ परिसरातील तृतीयपंथीयांची बैठक घेतली. त्यांना कोणती नोकरी करणे शक्य होईल याची चाचपणी केली. त्यावेळी तृतीयपंथी सुरक्षा एजन्सी चांगली चालवू शकतील. मॉलमध्ये, मोठ्या दुकानात त्यांना सुरक्षारक्षकाचे काम मिळू शकते, तसेच कार्यक्रमात सेलिब्रिटींच्या सुरक्षेचे काम मिळू शकते असा विचार करण्यात आला. त्यादृष्टीने त्यांना सुरक्षा एजन्सी स्थापण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याने गेल्या काही दिवसांत या विषयाकडे संपूर्ण लक्ष देणे शक्य झाले नव्हते. आता पुन्हा एकदा सर्व तृतीयपंथीयांना एकत्र करून त्यांना त्यांची संस्था स्थापन करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार असल्याचे फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले़. तरुण तृतीयपंथीयांकडून पोलिसांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. जुन्या लोकांना आपल्या कामात बदल करण्यात काही अडचण वाटत आहे, मात्र त्यांनाही यात सामावून घेण्यात येणार आहे. बुधवार पेठ व परिसरात सुमारे 250 ते 300 तृतीयपंथी आहेत़, तर शहरात सुमारे एक हजारांहून अधिक तृतीयपंथी असल्याचे पोलिसांच्या पडताळणीत आढळून आले आहे़. या तृतीयपंथीयांना शासनाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे़ त्यादृष्टीने आतापर्यंत त्यांच्याबरोबर पोलिसांच्या तीन बैठका घेण्यात आल्या आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply