Breaking News

मिसिंग लिंक प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पाहणी

खोपोली : प्रतिनिधी
जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गांतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर 2023 हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या (मिसिंग लिंक) प्रकल्पाला भेट देऊन लोणावळा (सिंहगड संस्था) येथे सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाची पाहणी गुरुवारी (दि. 10) केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) महासंचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर आदी उपस्थित होते.
मिसिंग लिंक प्रकल्पात जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे काम अतिशय आव्हानात्मक होते. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास 500 ते 600 फूट अंतरावर हा बोगदा आहे. बोगद्याची लांबी 8 किमी असून जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याची रुंदी 23.75 मीटर असून देशातील सर्वाधिक रुंदीचा हा बोगदा आहे. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. बोगद्यामुळे घाटाचा भाग पूर्णतः टाळला जाऊन अपघातसंख्येत मोठी घट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, या प्रकल्पामुळे प्रवास सुखकर होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल. त्याशिवाय प्रदुषण कमी होणार असून इंधनाची तसेच वेळेची बचत होईल. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. प्रवाशी, वाहने यांच्या सुरक्षेचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. दरडी कोसळू नये यासाठी सर्वत्र ‘रॉक बोल्ट’ करण्यात आले आहे. काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर जाण्यासाठी प्रत्येक 300 मीटरवर एक्झीट मार्ग तयार करण्यात आलेले आहेत. बोगद्याच्या भिंतीला पाच मीटरचे कोटिंग असणार असून त्यावर आगप्रतिबंधक कोटींग करण्यात येणार आहे. अत्याधुनिक हाय प्रेशर वॉटर मिक्स यंत्रणा असून त्यामुळे आग लागल्यास ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित होऊन आग विझेल, अशीही माहिती त्यांनी दिली.
या वेळी अधीक्षक अभियंता वसईकर यांनी प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्री महोदयांना माहिती दिली. कामाची गती राखून नियोजित वेळेआधी प्रकल्प पूर्ण करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.
नरीमन पॉइंट ते रायगड प्रवास वीस मिनिटांत
मुंबई : इंजिनिअरिंग या गोरेगाव येथील एसटेक प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन गुरुवारी (दि. 10) करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम देखील 84 टक्के पूर्ण झाले असून नरीमन पॉईंटहून वीस मिनिटांत रायगड जिल्ह्यात पोहचू शकणार आहोत, असे सांगितले.
मुंबईला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा हा 22 किमी लांबीचा देशातील सर्वाधिक मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे. या सागरी सेतूवरून दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता असून नागरिकांच्या वेळेची तसेच इंधनाची मोठी बचत होईल. हा प्रकल्प प्रदूषणविरहीत आहे. या प्रकल्पाचं काम करताना पर्यावरणासोबतच फ्लेमिंगोंचीदेखील काळजी घेण्यात आली आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक चिर्ले गावाजवळून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प ‘ईस्टर्न फ्री वे’ला जोडणार असल्याने मुंबईतून थेट रायगड असा प्रवास करणे शक्य होणार आहे. शिवाय मुंबई -वरळी कोस्टल रोडदेखील शिवडी वरळी कनेक्टरमार्गे जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply