ज्या महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, ती महाविकास आघाडी आज ‘आहे आणि नाही’ अशा अवस्थेत तग धरून आहे. मुळात ही आघाडी केवळ सत्तेपुरती होती हे उघड आहे. सत्ता गेल्यानंतर ही आघाडी निरर्थक ठरल्यात जमा आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी नवी राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी धावाधाव सुरू केलेली दिसते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन नुकताच पार पडला. दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आवर्जून उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदी असताना शिष्टाचारापुरते ते चैत्यभूमीवर एक-दोनदा येऊन गेले असतील, परंतु त्याआधी या परिसरात त्यांना कुणी पाहिल्याचे आठवत नाही. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची व्यक्तिश: धावाधाव सुरू आहे आणि ती धावाधाव सारा महाराष्ट्र शांतपणे पाहात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना या पक्षाची दोन शकले झाली, त्यापैकी एक मोठा भाग आजही राज्याचा कारभार पाहतो आहे आणि उरलीसुरली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या अस्तित्वाची लढाई लढते आहे. मध्यंतरी ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडचा हात हाती धरला. ज्या संघटनेवर अमर्याद टीका केली, ती संघटना आता ठाकरे यांच्या पक्षाला हवीहवीशी वाटू लागली यात कसलेही गूढ नाही. हे निव्वळ मतांच्या राजकारणापायी घडते. उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर लाल गुलाबाचे फूल धरले. त्यातही आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. शिवसैनिकांना काय वाटते याची पर्वा ठाकरे यांनी या आधीही कधी केली नव्हती, यापुढे देखील आपल्या सैनिकांना काय वाटते याचा विचार ते करणार नाहीत हे उघड आहे. ठाकरे गट आणि आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांच्यात आघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दोघा नेत्यांमध्ये नुकतीच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात एक बैठकदेखील झाली. अर्थात ही बैठक बंद दाराआड झाल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी सावधपणे पावले उचललेली बरी. कारण बंद दाराआड घडलेल्या किंवा न घडलेल्या गोष्टींचे राजकारण करण्याची काही लोकांना सवयच जडलेली असते. वंचित आणि ठाकरे गटामध्ये नजीकच्या भविष्यकाळात आघाडी झाली तरी त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा काही परिणाम होणार नाही. या दोन्ही पक्षांची आघाडी झाली हे गृहित धरले तरी वंचितचे कार्यकर्ते हिंदुत्ववादी शिवसेनेला मतदान करणार का, हिंदुत्वाचा वारंवार उद्घोष करणार्या शिवसेनेचे कार्यकर्ते वंचितच्या कार्यकर्त्यांशी खांद्याला खांदा भिडवून निवडणुकीत काम करणार का असे जटिल प्रश्न आधी सोडवावे लागतील. वंचित बहुजन आघाडी काय किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय, या दोन्ही पक्षांचे स्वभाव आणि कार्यपद्धती यामध्ये जमीन-अस्मानाचे अंतर आहे. निव्वळ मतांच्या राजकारणासाठी एकत्र यायचे म्हटले तरी ते सहजासहजी यशस्वी होणारे नाही आणि यशस्वी झाले तरी त्याचा भाजपवर काही परिणाम होण्यासारखा नाही. प्रकाश आंबेडकर म्हणजेच एकगठ्ठा दलित मते असे मानण्याचे काहीच कारण नाही. शक्तिवर्धकाच्या शोधात असलेले तोळामासा प्रकृतीचे दोन पक्ष एकत्र येण्याने काहीही साध्य होणार नाही.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …