मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यातील थेट सरपंच पदाकरिता 24 तर सदस्यपदासाठी 117 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी (दि. 7) अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी सरपंचपदाचे 11 तर सदस्य पदाचे 46 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. मुरूड तहसीलदार कार्यालयासमोरील दरबार हॉलमध्ये बुधवारी सकाळी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गर्दी झाली होती. काकळघर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाचे चार तर सदस्य पदाचे 20 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे काकळघर ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या नऊ जागांसाठी 19 तर थेट सरपंच पदाकरिता चार उमेदवार रिंगणात आहेत. कोर्लई ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाचे 14 तर सरपंच पदाचे चार उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे तेथे थेट सरपंच पदासाठी चौरंगी लढत होणार आहे तर नऊ सदस्यांसाठी 23 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. वावडुंगी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाचे दोन उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने आता तेथील सात सदस्यांसाठी नऊ उमेदवार नशीब आजमावित आहेत. तर थेट सरपंच पदासाठी दुरंगी लढत होणार आहे. वेळास्ते ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाचे तीन तर सदस्य पदाचे चार अर्ज बुधवारी मागे घेण्यात आले. आता तेथे सदस्य पदाच्या सात जागांसाठी 14 तर सरपंच पदाकरीता दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तेलवडे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाचे पाच उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे जेव्हढ्या जागा तेव्हढेच उमेदवार झाल्याने तेलवडे ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर मुरूडचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रोहन शिंदे व निवडणूक नायब तहसीलदार अमित पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.