स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळवून देण्यात काही अवधी लागत असल्याने मुंबई-गोवा महामार्गाचे महाडमधील काम अपूर्ण आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसर्या टप्प्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले असले तरी आजही महामार्ग पूर्ण करून देण्यात काही समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक महामार्ग प्रशासन आणि महसूल प्रशासन संबंधित कंपन्यांना आवश्यक परवानग्या वेळेत मिळवून देत नसल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे. महामार्ग ठेकेदार कंपनी महामार्ग वेळेत पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे, मात्र अनेक ठिकाणी जमीनमालक आणि वन खात्याच्या अडचणी असल्याने महामार्गाचे काम शिल्लक आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला पनवेल ते इंदापूर सुरवात 10 वर्षांपूर्वीच झाली होती. 25 टक्के कामदेखील पूर्ण होऊ शकले नाही. त्या वेळच्या तत्कालीन आघाडी सरकाच्या नाकर्तेपणा व त्या वेळचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेमुळे हे काम जे रखडले आज तसुभरही झालेले नाही. नियोजनाच्या अभावामुळे हे काम आजही अर्धवटच आहे. दुसर्या टप्प्याच्या कामाला इंदापूर ते कोकणच्या तळा पर्यंतच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा काळ वगळता केवळ तीन वर्षांत दुसर्या टप्प्याचा चौपदरीकरणचे काम जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे, मात्र काही भागात वन विभागाची परवानगी नसल्यामुळे काम थांबलेले होते. महाड, माणगाव आणि पोलादपूर तालुक्यात हीच परस्थिती निर्माण झाली होती 65 किमीच्या अंतरामध्ये 6 किमी मध्ये वनखात्याच्या जमिनी असल्यामुळे या विभागाकडून अद्याप परवानगी मिळाली नव्हती त्यामुळे या अंतराचे काम आज ही थांबलेले आहे. दुसर्या टप्प्याच्या कामामध्ये इंदापूर ते पोलादपूर या 65 की मीटरच्या अंतरामध्ये माणगाव तालुक्यात 3:15 आणि महाड तालुक्यात 2:95 की मी अंतरामध्ये 18.44 हेक्टर ही वनखात्याची जमीन आहे. या जमिनीमध्ये अद्याप वनखात्या कडून राष्ट्रीया महामार्गाच्या कामाला परवानगी मिळाली न्हवती. या परवानगीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून 2018 साली वन खात्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. अनेकवेळा वन विभागाकडून त्रुटी काढून हा प्रस्ताव लाल फितीत अडकून राहत होता. अखेर एप्रिल 2021मध्ये पहिल्या टप्प्यात परवानगी मिळाली त्यानंतर काही अटी शर्तीवर 15.91 कोटी रुपये भरून या ठिकाणच्या कामाला परवानगी देण्याचे निश्चय झाले. त्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रस्ताव तयार करून वनखात्याकडे पाठवण्यात आला मंजुरी मिळताच 2 ऑक्टोबर 2022मध्ये महामार्ग विभागाकडून 15.91 कोटी ही रक्कम वनखात्याकडे वर्ग करण्यात आली. ज्या ठिकाणी 65 किमी अंतरामध्ये वन खात्याच्या जमिनी आहेत त्या ठिकाणी महामार्ग विभागाला नोव्हेंबर 2022 मध्ये अखेर कामाची परवानगी मिळाली. महामार्ग विभागाने वृक्ष लागवड करणे आणि वन संवर्धन याकरिता हि रक्कम भरून घेतली आहे. वन खात्याची परवानगी मिळाली असली तरी अद्याप या मार्गात मालकी जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न आज ही कायम असल्याने या ठिकाणी काम थांबणार आहे. महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यात 38.76 किलोमीटरचे काम आहे. या टप्प्यात 35 किलोमीटरचे काम ठेकेदार कंपनी एल.अॅन्ड.टी. यांच्याकडून पूर्ण झाले आहे, मात्र दासगाव ते वीर या टप्प्यात वनखात्याची परवानगी नसल्याने काम बंद होते काही दिवसापूर्वी या खात्याने कामास परवानगी दिल्याने सध्या या टप्प्याचे काम सुरू झाले आहे मात्र खाजगी जमीन मालकांना अद्याप परवानगी न दिल्याने जमीन मालक आपल्या जमिनीमधून काम करून देण्यास तयार नाहीत. यामुळे मालकी जमिनीत कामाला अडथळे निर्माण झाले आहेत. महाड वीर कशेडी या टप्प्यात 35 कीमीचे काम पूर्ण झाले आहे. महाड तालुक्यातील वीर या गाव हद्दीतील 7 जमीन धारकांचा मोबदला मिळालेला नाही, दासगावमध्ये 3, साहिल नगर 4, एम.आय.डी.सी. 2 आणि पोलादपूर तालुक्यातील चोळई या ठिकाणच्या 4 शेतकर्यांचा मोबदला शिल्लक आहे. शिल्लक राहिलेले काम ठेकेदार कंपनी ही पावसापूर्वी पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. जर उर्वरित प्रश्न या दरम्यान मार्गी लागला नाही तर ही ठेकेदार कंपनी काम सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचे कंपनीच्या अधिकार्यांकडून बोलले जात आहे. राजेवाडीजवळ उच्च दाबाची वीज वाहिनीमुळे काम थांबलेलेच. वन विभागाचा अडसर दूर झाला असला तरी राजेवाडी गावाजवळ महामार्गावरून कोयना वीज प्रकल्पाची अति उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. जुन्या महामार्गाला भराव करून याठिकाणी उंची वाढवण्यात आली आहे. यामुळे विद्युत वाहिनी आणि रस्त्यातील अंतर कमी झाले आहे. यामुळे याठिकाणी ही विद्युतवाहिनी बाजूला करणे गरजेचे आहे. कोयना प्रकल्पाची ही विद्युतवाहिनी दूर करणे सहज शक्य नाही. यामुळे याठिकाणी हे काम थांबले आहे. दोन्ही बाजूने काम पूर्ण झाले असले तरी विद्युतवाहिनीच्या खालील भाग रखडला आहे. महामार्गाच्या कामापूर्वी चुकीचा सर्व्हे झाल्यामुळे अनेक भागात अशा प्रकारे काम रखडल्याचे समोर येत आहे.
-महेश शिंदे