Monday , February 6 2023

पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा

विविध विषयांवर चर्चा करून मंजुरी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शनिवारी (दि. 21) झाली. ही सभा महापालिकेच्या सभागृहात स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली.

पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विधानसभा निवडणूक 2019करिता दिव्यांग कल्याण निधीतून दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम भारत सरकारच्या उपक्रमातून केलेल्या खरेदीस मान्यता देण्यात आली आहे व या कामासाठी सुपरव्हायजर नेमण्यात आला असून, त्याची देखभाल तोच करणार आहे. तर महापालिका हद्दीतील पनवेल शहरातील महात्मा गांधी उद्यानाचे सुशोभीकरण करणे व त्या अनुषंगाने येणारी इतर कामे करण्यासाठी प्राप्त झालेल्या न्यूनतम दराच्या ई-निविदेस  मान्यता देण्यात आली आहे.

 तसेच महापालिका क्षेत्रात 50 कंटेनर टॉयलेट खरेदी करून बसविण्याच्या विषयाची माहिती मागविण्यात आली असून, या विषयावर पुढील स्थायी समितीच्या सभेत चर्चा करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील प्रभाग समिती ‘अ’ प्रभाग क्रमांक 1 मधील करवले या गावाच्या पायाभूत सुविधा पुरविण्याच्या कामी प्राप्त झालेल्या न्यूनतम दराच्या ई-निविदेस मान्यता देण्यात आली असून, स्मार्ट विल्हेजची कामे लवकरात लवकर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घनकचरा विभागामार्फत महापालिका हद्दीत 5 ते 25 लक्षांपर्यंत करण्यात आलेल्या कामांचा अहवाल माहितीस्तव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच महापालिकेच्या मालमत्ता कर निर्धारण व पाणीपुरवठा कर संकलन विभागासाठी नवीन संगणक प्रणाली सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर व प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविणेबाबत प्राप्त झालेल्या न्युनतम दरास व संबंधित विभागासाठी बँकेमध्ये स्वतंत्र खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली असून, हे सॉफ्टवेअर 20 वर्षांसाठी तर मनुष्यबळ तीन वर्षांसाठी

उपलब्ध असणार आहे.

या सभेला सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अजय बहिरा, मुकीद काझी, नगरसेविका सीता पाटील, अरुणा पाटील, प्रमिला पाटील, आरती नवघरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply