Breaking News

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू

नवी मुंबई : प्रतिनिधी
बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान वॉटर टॅक्सी सेवेचे शुभारंभ मंत्री, बंदरे व खनिजकर्म, महाराष्ट्र राज्य दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे, ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड सीईओ डॉ. अमित सैनी, सोहिल खजानी, कॅप्टन रोहित सिन्हा आदी उपस्थित होते.
बेलापूर जेट्टी येथून मंगळवार (दि. 7)पासून वॉटर टॅक्सी प्रवाशी वाहतूक सुरू झाली. या वेळी बंदरे विकास मंत्री दादा भुसे आपल्या भाषणात म्हणाले की, नवी मुंबई या आधुनिक शहरात महत्वाकांक्षी वॉटर टॅक्सी प्रवाशी वाहतुकीचा शुभारंभ जल मार्गाने होत आहे यांचा आपणास आनंद आहे. यापूर्वी बेलापूर जेट्टी ते भाऊचा धक्का अशी प्रवाशी सेवा सुरू होती, मात्र कालांतराने ती बंद करण्यात आली याची खंत वाटते. नव्याने बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया ही टॅक्सी प्रवाशी सुविधा सुरू झाली आहे, याकरिता मुंबई पोर्ट ट्रस्ट व केंद्र सरकार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आम्ही आभारी आहोत.
वॉटर टॅक्सी प्रवाशी सेवा सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेऊन स्थानिकांना रोजगार कसा मिळेल सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष देणार आहे. भविष्यात विमानतळ सेवा कार्यान्वित होणार आहे यामुळे नवी मुंबई शहराला आगळेवेगळे महत्व निर्माण होणार आहे. नवी मुंबईत मंदाताई म्हात्रे ह्या लढाऊ संघर्षशील नेतृत्त्व आहे. त्यांनी शहराचा जलदगतीने विकास व्हावा केंद्राचा मरिना प्रकल्प मार्गी लागावा यासाठी केलेल्या सूचनांची आम्ही अंमलबजावणी निश्चितच करू, अशी ग्वाही दिली.
आमदार म्हणून मोठी विकास कामे आपण मार्गी लावली आहेत, चांगले प्रकल्प सुरू आहेत विकासकामे करताना यापुढे भाऊ या नात्याने सांगतो तुम्हाला माझ्याशी भांडण करावे लागणार नाही अशी ग्वाही दिली. वॉटर टॅक्सी प्रवाशी दर कमी कसे करता येईल याकडे लक्ष देऊन प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प यशस्वी करणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.
या जलमार्गामुळे दीड तासाचा प्रवास 50 ते 55 मिनिटांवर येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न प्रवाशांना करणार आहोत. गेट ऑफ इंडियाच्या पुढे रेडिओ क्लबला सरकारने जेट्टीसाठी परवानगी दिली आहे रस्त्यांवरचा ताण कमी होईल, लोकांचा वेळ वाचेल प्रवाशांना जलद आणि सुलभ सेवा देण्याबरोबर पर्यावरणाचा समतोल राहील याकडे त्यांनी लक्ष वेधले. गेटवे ऑफ इंडिया हे बिझिनेस सेंटर असून ही सेवा निश्चितच किफायतशीर ठरेल भविष्यात प्रवाशी संख्या वाढल्यावर फेर्‍या वाढतील पर्यायी भाडे आकारणी कमी होईल, असा आशावाद मंत्री भुसे यांनी व्यक्त केला. जलमार्गाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना भविष्यात व्हेहिकल सारख्या सुविधा देण्याचा विचार केला जाईल. ही सुरुवात आहे. त्यामुळे इथून पुढे कसे वाढवता येईल याकडे पूर्णपणे लक्ष देणार असून वॉटर टॅक्सीची दर जास्त असल्यामुळे रेल्वेसारख्या पासची सुविधा करण्याकडे लक्ष देऊन प्रवाशांना उत्तम सुविधा कशा मिळतील यावर भर देणार तसेच प्रवाशांचा प्रतिसाद पाहून जलमार्ग प्रवासी तिकिटाचे दर कमी करण्यात येणार असल्याचे या वेळी दादा भुसे यांनी सांगितले.

– असे असतील तिकीट दर

मंगळवारपासून गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूरदरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. मुंबई पोर्ट अथॉरिटीने नयनतारा शिपिंग कंपनीला प्रवासी सेवा चालविण्याची मान्यता दिली आहे. नयन इलेव्हन या वॉटर टॅक्सीमध्ये खालच्या डेकवर 140 प्रवासी प्रवास करू शकतात. यासाठी त्यांना 250 रुपयांचे तिकीट असेल तर बिझनेस क्लासमधून 60 प्रवासी प्रवास करू शकतात यासाठी प्रवाश्यांना 350 रुपये मोजावे लागतील. ही प्रवासी बोट सकाळी 8.30 वाजता बेलापूर जेट्टी वरून निघेल जी 9.30 वाजता गेट वे ऑफ इंडिया ला पोहचेल तर संध्याकाळी 6.30 वाजता गेट वे ऑफ इंडिया वरून निघेल जी 7.30 वाजता बेलापूर जेट्टीवर पोहचेल.

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply