कर्जत ः बातमीदार
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माथेरानमध्ये बुधवारी (दि. 27) ई-रिक्षाची चाचणी घेण्यात आली. या वाहनांचे माथेरानकरांनी जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, चाचणीसंदर्भातील अभिप्राय सनियंत्रण समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ई-रिक्षाच्या चाचणीवेळी राज्य प्रादेशिक परिवहन उपअधिकारी चंद्रकांत माने, पनवेल विभागीय प्रादेशिक अधिकारी संजय पाटील, अजय कराळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे विद्यासागर किर्लोस्कर, आर. एस. कामत, पोलीस अधिकारी शेखर लव्हे, पालिकेच्या प्रशासक सुरेखा भणगे उपस्थित होते. त्याचप्रमाणे ई-रिक्षाचे याचिकाकर्ते सुनील शिंदे, माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, व्यापारी, नागरिक, विद्यार्थी ई-रिक्षांच्या स्वागतासाठी दस्तुरी नाक्यावर उपस्थित होते. माथेरानमध्ये एकूण पाच कंपन्यांच्या ई-रिक्षा चाचणीकरिता दाखल झाल्या. तीन महिने या रिक्षांचे परीक्षण घेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी चढ-उतार आहेत तेथे ही रिक्षा कशा प्रकारे धावेल याची सविस्तर माहिती वरिष्ठांना देण्यात येणार आहे. ‘पहिल्या दिवशी झालेल्या चाचणीचा अहवाल रायगड जिल्हाधिकारी यांना पाठविला जाईल. या ई-रिक्षा पर्यटक तसेच स्थानिक यांच्यासाठी असणार आहेत. शासन ज्या वेळी त्या सर्वांना खुल्या करतील त्या वेळी प्रवासी वाहतूक सुरू होईल, तर सामान वाहून नेण्यासाठी अन्य रिक्षा वापरात आणण्याचे शासनाचे धोरण त्या त्या वेळी जाहीर होईल, अशी माहिती प्रशासक भणगे यांनी दिली.