थरारक आणि कठीण चढाई ; मॅकमोहन हुले, अमित तोरसकरांचे कौतुक
पाली : प्रतिनिधी
पालीतील सरसगड किल्ल्याच्या भोवती असलेले तीन सुळके मॅकमोहन हुले व अमित तोरस्कर या दोघांनी सर केले आहेत. ही अतिशय कठीण व थरारक चढाई करण्यात आली. या थरारक चढाईचा अनुभव मॅकमोहन हुले यांनी सांगितला. अमित तोरस्कर आणि मॅकमोहन हुले पाण्याचे व जेवणाचे नियोजन करून 25 जानेवारीला सरसगडाच्या मध्यस्थानी तंबू लावून रात्र काढली. 26 जानेवारी पहाटे 6 वाजता रेखी करत सुळक्याच्या मध्यस्थानी पोहोचले. दोघांचे आरोहण असल्याने बॅगा सुरक्षित करण्यासाठी खिंडीत तंबू लावला जेणेकरून माकडे त्रास देणार नाहीत. दुपारी एकच्या सुमारात घेरा-सरसगड 1 व 2 सुळके सुरक्षित आरोहण करून, तंबू व बॅगा आवरून घेरा-सरसगड सुळका तीनच्या वाटेवर झाडाखाली दुपारचे भोजन केले. तिथेही तंबू लावून बॅगा सुरक्षित करून तासभर थोडा आराम केला. घेरा सरसगडच्या तिसर्या सुळक्याच्या कंगोर्यात पोहोचताच असे लक्षात आले की याच्यावरील बाजूस मधमाश्यांचे राहण्याचे ठिकाण असल्याने आरोहण थोडे असुरक्षित होऊ शकते. हे लक्षात घेऊन चढाईला सुरुवात केली. जवळपास एक तासात माथा गाठला पुन्हा खाली उतरण्यासाठी ओपनबुकच्या इथून खाली उतरण्यासाठी बोल्ट मारण्याचा प्रयत्न केला. आणि मधमाशांचे थैमान चालू झाले. अर्धा तास दोघेही तेथे बसूनच राहिलो. बेसवर असलेल्या ठिसूळ दगडावर बैलगाठ मारून सुरक्षित उतरण्याचा प्रयत्न केला. आणि पुन्हा माघारी दुसर्या रस्त्यांनी खाली उतरले.सुळक्याची व आरोहणातील मार्गाची उंची 200 फूट, जवळपास एक तास सुळका तीनच्या खिंडीजवळ पोहोचता येते. पहिला टप्पा 50 फूट अवघड श्रेणी चिमणी आरोहण करिता दोन भिंतींमधून एकीकडे पाठ लावून व दुसरीकडे हात व पायाच्या आधारे चढणे (टेक्निक: बॅकिंग-अप/बॅकिंग-डाऊन),दोन भिंतींमध्ये फसलेल्या दगडाला चॉक-स्टोन म्हणतात. सुरक्षतेसाठी या दगडाला दोर ओऊन घेणे. पुन्हा 50फुटामध्ये चिमणीतील वरचा चॉक-स्टोन या अवघड टप्प्यात 2चॉक-स्टोन आढळतात. 25फूट सरळ व डावीकडे अवघड आरोहण करून ओपनबुकपर्यंत पोहोचायचे. पुन्हा अंतिम टप्पा 75 फूट,पारंपारिक रूट,अवघड श्रेणी, ओपनबुकमधून जवळपास 50 फूट आरोहण करून वर यायचे.अंतिम 25फूट सोपे आरोहण करून माथा गाठायचा. माथ्यावरील झाडांना दोर बांधायचा. याही माथ्यावर मोठी सपाट जागा आहे.
पोहोचण्याचा मार्ग
सरसगडाच्या पायथ्याला असलेल्या पाली या गावात यायचे. मुंबईहून पालीत पोहोचण्यासाठी एसटी बससेवा उपलब्ध आहे. किंवा मुंबईहून मध्य रेल्वे लोकल ट्रेनने खोपोलीला पोहोचायचे.खोपोली ते पाली एसटी सेवा उपलब्ध आहे. तसेच नागोठणे लोकल ट्रेन पासून पाली आठ किलोमीटर अंतर रिक्षा व विक्रम सेवा आहेत पालीला उतरून घेरा सरसगड हे गाव गाठायचं. गावात आल्यानंतर सरसगडाच्या चिटकलेले घेरा-सरसगड सुळके आपल्याला दिसतात. गावातून GS-I व GS-II सुळक्याच्या मध्य असलेल्या खिंडीत चढायचं खिंडीतून दोन्ही सुळक्याच्या आरोहण मार्गाचा प्रारंभ होतो.
घेरा सरसगड सुळका एक
या सुळक्याची उंची 200 फूट आहे. खिंडीतून आरोहनाला सुरुवात होते. जवळजवळ एक तास लागतो. पहिला टप्पा 100 फूट, कठीण श्रेणी तिरके उभे आरोह करून एका अतिशय छोट्या कंगोर्यात पोहोचायचं. तिथे लावलेल्या खेळाला दूर बांधायचा मार्गात पिटॉन लावता येतात. अंतिम टप्पा 100 फूट, कठीण श्रेणी. कंगोर्या वरून डावीकडे पंधरा फूट तिरके आरोहण करायचे त्यानंतर उभे आरोह करून माथा गाठायचा. माथ्यावरील झाडांना दोर बांधायचा.
घेरा सरसगड सुळका दोन
या सुळक्याची उंची 100 फूट, वेळ अर्धा तास, सोपी श्रेणी. खिंडीतून आरोहणाला सुरुवात होत. एकाच टप्प्यात सोपे आरोहण करून माथा गाठता येतो. मार्गात सुरक्षतेसाठी पिटॉन लावून दोर ओवता येतो. माथ्यावरील झाडांना दोर बांधायचा. माथ्यावर मोठी सपाट जागा आहे. (आरोहण करताना घ्यावयाची काळजी येथे खिंडीमध्ये सुळका दोनवरील दगडाला मधमाशांची पोळी आहे.)