Breaking News

चौल-सराईमधील भाविकांचे श्रध्दास्थान व जागृत सोमेश्वर मंदिर

चौलनाका ते वावे या मुख्य रस्त्यावर चौल ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हनुमानपाडा व सराई गावाच्या मध्ये असलेल्या छोट्याशा चढावावर पुर्वाभिमुख सोमेश्वर मंदिर पहाण्यास मिळते. हनुमानपाडा व सराई यांचेमधील छोट्याशा डोंगर टेकडीवर असलेले निसर्ग सानिध्यातील शांत व हवेशीर ठिकाणी वसले आहे. हे मंदिर कोणी व कधी बांधले यांच्या इतिहास सापडत नाही, परंतू हे मंदिर इतिहासकालीन असावे असे मंदिराचे बांधकाम पाहताच जाणवते.या मंदिराचा जिर्णोध्दार नुकताच करण्यात आला आहे. मात्र जिर्णोध्दार करताना जुने मंदिराची ठेवण तशीच्या तशी ठेवण्यात आली आहे. मंदिरात प्रवेश करताना नव्याने बांधण्यात आलेली दगडी आकर्षक कमान लक्ष्य वेधून घेते. मंदिराचे बाहेर नुकताच बांधण्यात आलेला प्रशस्त सभामंडपात प्रवेश केल्यावर मन प्रसन्न होते. तेथून पुढे एकापुढे एक अशा दोन दगडी चौकोनी इमारतीपैकी मागील म्हणजेच गाभार्‍याच्या इमारतीवर पसरट व कमी उंचीचा गोलाकार घुमट आहे. या घुमटापैकी बाह्य मंडप अष्टकोनी आकाराचा आहे. सुमारे 7.62 मीटर चौकोनी आहे. तर गाभारा सुमारे 6.09 मीटीर चौकोनी असून त्याच्या भिंती 3.35 उंच आहेत. माभार्‍याच्या मध्यापासून घुमटाची उंची 4.57 मीटर आहे. गाभार्‍यात जर लाईट नसेल तर खूपच अंधार जाणवतो. पुढच्या मंडपापेक्षा गाभारा सुमारे 1.83 मीटर खोलगट आहे. गाभार्‍याकडे तोंड करून उभे राहिले असता डाव्या बाजूस गाभार्‍याच्या मंदिराबाहेर विहीर आहे. तेथे साठलेले पाणी झिरपून गाभार्‍यात येते. मंदिरात प्रवेश करताना अष्टकोनी सभामंडपात गाभार्‍याच्या अगदी समोर नंदी आहे. तेथूनच गाभार्‍यात प्रसन्न अशी श्री शंकराची पिंड दिसते. आतमध्ये श्री शंकराच्या पिंडीकडे नजर टाकल्यास मनात श्रध्दा व भक्ती आपोआप जागृत होते.
हे सोमेश्वर मंदिर पंचक्रोशीतील भाविकांचे श्रध्दास्थान असून जागृत देवस्थान म्हणून परिचीत आहे. येथे दर सोमवारी भाविकांची गर्दी असते तसेच महाशिवरात्रीचे वेळी या मंदिरात येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने उत्सव
साजरा करतात.
-महेंद्र खैरे, रेवदंडा

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply