Breaking News

शेतकर्‍यांच्या सहनशिलतेचा ‘बांध’ फुटतोय…

अलिबाग तालुक्यातील खारेपाटाला उधाणाची समस्या गेले काही वर्षे भेडसावत आहे, परंतु त्याकडे कुणी लक्ष देत नाही. दर महिन्याला या भागात उधाणाचे पाणी धुसते. शेतजमीन नापिक बनत चालली आहे. आता हे पाणी घरांमध्येदेखील शिरू लगले आहे. दोनच दिवसांपूर्वी शहापूर उधाणाचे पाणी घरांमध्ये शिरले. 23 घरांचे नुकसान तर झाले, पण 300 एकर शेतीला या उधाणाचा तडाखा बसला आहे. उधाणाच्या पाण्यासोबत शेततळ्यातील जिताडे मासेही वाहून गेले. हे आता नेहमीचे झाले आहे. यावर शासनाने उपाययोजना केली पाहिजे. खारबंदिस्तीची दुरुस्ती तातडीने केली पाहिजे. जेथे नवीन खारबंदिस्तीची गजर आहे, तेथे खारबंदिस्ती केली पाहिजे. ऑगस्ट 2021मध्ये शहापूर गावालगत असलेल्या खारबंदिस्तीला तडे गेले होते. तेव्हापासून खाडीतील उधाणाचे पाणी लगतच्या परिसरात शिरण्यास सुरुवात झाली होती. गावकर्‍यांनी वेळोवेळी ही बंदिस्ती दुरुस्त करण्याची मागणी केली होती, पण प्रशासनाने तांत्रिक कारणे पुढे करीत गावकर्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. खारबंदिस्तीच्या दुरुस्तीसाठी पोहोच रस्ता तयार करणे आवश्यक आहे. या रस्त्यासाठी आवश्यक सामुग्री देण्याची तयारी एका कंपनीने दाखवली होती. ग्रामस्थांनी रोजगार हमीतून खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्याची तयारी दाखवली होती, मात्र प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने वर्षभरानंतरही हे काम सुरू होऊ शकलेले नाही. 13 वर्षांपूर्वी धेरंड-शहापूर परिसरातील जमिनी टाटा पॉवरच्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या, पण नंतर हा प्रकल्प रद्द झाला. त्यामुळे या जागा वापराविना एमआयडीसीच्या ताब्यात पडून आहेत. एमआयडीसीने खाडी किनार्‍यावर असलेल्या बांधबंदिस्तीच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे उधाणाच्या वेळी बंदिस्तीला तडे जाऊन लगतच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. शासकीय विभागात समन्वय नसल्यमुळे खारबंदिस्ती दुरुस्तीची कामेे रखडली आहे. त्याचे परिणाम या भागातील शेतकर्‍यांना भोगावे लागत आहेत. समुद्राला येणार्‍या उधाणामुळे खाडीकिनारी असलेल्या गावांमध्ये पाणी शिरून नुकसान होत असते. खारबंदिस्ती फुटल्याने समुद्राचे पाणी शेतात आणि गावात शिरण्याच्या घटना घडत असतात. हल्ली तर अशा घटना वाढत चालल्या आहेत. समुद्राचे खारे पाणी शेतजमिनीत घुसून शेतजमीन नापिक होत आहे, परंतु या नुकसानीकडे शासन लक्ष देत नाही. उधाणांमुळे होणार्‍या नुकसानीचीभरपाई शेतकर्‍यांना मिळावी यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हव्यात. उधाणापासून संरक्षण व्हावे म्हणून किनारपट्टीवरील भागात खारबंदिस्ती केली जाते. गेले अनेक वर्षे या खारबांधांची दुरुस्ती नकेल्यामुळे समुद्राला मोठ उधाण आले की, लाटांच्या मार्‍यामुळे बंधार्‍यांना तडे जातात. त्यामुळे उधाणाचे पाणी खाडीलगतच्या शेतात शिरते. त्यामुळे शेतजमीन नापिक होत आहे. रायगड जिल्ह्यातील तीन हजार 16 हेक्टर येवढे शेतीक्षेत्र उधाणांमुळे कायमचे नापिक झाले आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अजून किती हेक्टर जमीन नापिक करणार आहात? असा सवाल उपस्थित होत आहे. उधाणांमुळे खाडीकिनार्‍यावरील गावांचे नुकसान होते. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. शेतात खारेपाणी शिरल्यामुळे शेतजमीन नापिक होते. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न बंद होते. शेतजमीन नापिक झाल्याामुळे तेथे शेती केली जात नाही. त्यामुळे शेतमजुरांवर बेरोजगारीची समस्या उद्भवते. महत्त्वाची बाब म्हणजे समुद्राला येणार्‍या या उधाणांचा शासनाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये समावेश होत नाही. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले, तरी शेतकर्‍यांना मदत मिळू शकत आहे. रायगड जिल्ह्यातील 21 हजार 296 हेक्टर खारभूमी क्षेत्राचा समावेश आहे. यातील अलिबाग तालुक्यातील तीन हजार 16 हेक्टर खारभूमी क्षेत्र उधाणामुळे कायमचे नापिक झाले आहे. समुद्राला येणार्‍या उधाणांचा नैसर्गिक आपत्तीत समावेश नसल्याने कोकणातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. दुर्दैवाने याकडे कुणी गांभीर्याने पाहात नाहीत. अलिबाग तालुक्यातील माणकुळे, बहिरीचा पाडा, हाशिवरे, कावाडे, सोनकोठा, रांजणखार डावली, मेढेखार, देहेनकोटी यांसारख्या गावांना उधाणाच्या पाणमुळे होणार्‍या नुकसानीची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. इतरही गावांमध्ये नुकसान होत असते. याबात महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यायल हवा. उधाणाचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई दिली पहिजे.
राज्य सरकारने समुद्री उधाणांना नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावे, अशी मागणी येथील शेतकरी गेली कित्येक वर्षे करीत आहेत. याबाबात महाराष्ट्र शासनाने धोनणात्मक निर्णय घ्यायला हवा. त्याचबरोबर उधाणाच्या पाण्यामुळे होणारे नुकसान टळण्यासाठी अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागत मंजूर झालेल्या खारबंदिस्तीच्या कामांना सुरुवात करायला हवी. ज्या खारबंदिस्ती नादुरुस्त झाल्या आहेत त्यांची तातडीने दुरुस्ती करून घ्यायला हवी.
-प्रकाश सोनवडेकर

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply