विद्यार्थ्यांच्या आग्रहानुसार महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या अर्थात एमपीएससीच्या परीक्षांचा नवा पॅटर्न लागू करण्याचा हट्ट अखेर आयोगाने सोडून दिला आहे. राज्य सेवा परीक्षा यंदापासून नव्या पॅटर्ननुसार घेण्यात येणार होत्या. विद्यार्थ्यांचा त्याला कडाडून विरोध होता. परिणामी, या परीक्षा अखेर दोन वर्षे उशीराने नव्या पॅटर्ननुसार घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. नव्या पॅटर्ननुसार राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेचा संपूर्ण ढाचाच बदलून जाणारा ठरला असता. तेवढी तयारी करण्याइतका वेळ आम्हाला मिळालेला नाही असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नात जातीने लक्ष घातले आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे रास्त असल्याचे एमपीएससीला पटवून दिले. थोडीफार खळखळ केल्यानंतर एमपीएससीने नवा पॅटर्न दोन वर्षे पुढे ढकलला. याचाच अर्थ असा की, यंदा आणि पुढील वर्षी जुन्या पद्धतीनेच परीक्षा होतील. वास्तविक विद्यार्थी वर्गाचे म्हणणे रास्त असले तरी कधी ना कधी एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीत बदल करावाच लागणार आहे. हे केलेले बदल विद्यार्थीवर्गाच्या हिताचेच आहेत हेदेखील लक्षात घ्यायला हवे. सध्या तरी हे बदल विद्यार्थ्यांच्या पचनी पडलेले नाहीत हे मात्र खरे. काय आहेत हे बदल? तसे पाहू गेल्यास परीक्षा पद्धतीतील बदल मोठेच आहेत. उदाहरणार्थ एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत आजवर सहा प्रश्नपत्रिका असत. त्यांची संख्या नव्या पॅटर्ननुसार नऊ झाली आहे. त्यातील सात प्रश्नपत्रिका अनिवार्य स्वरुपाच्या आहेत. निबंध लेखनासाठी एक प्रश्नपत्रिका, जनरल स्टडीजसाठी चार आणि उमेदवाराने निवडलेले अन्य दोन विषय अशा या प्रश्नपत्रिका असणार आहेत. उमेदवाराला स्वत:च्या आवडीचे विषय निवडण्यासाठी भरपूर संधी देण्यात आली आहे. तब्बल 26 विविध विषयांमधून विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे दोन विषय निवडावे लागतील. परीक्षा पद्धतीतील बदलांना विरोध करण्यासाठी एमपीएससीच्या उमेदवार विद्यार्थ्यांनी गेले दोन दिवस उग्र आंदोलने केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक पक्षाच्या नेत्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा आक्षेप होता, तो उत्तर पत्रिकांच्या नव्या आकृतीबंधाबाबत. आजवर एमपीएससीच्या परीक्षा वस्तुनिष्ठ उत्तरांनिशी सोडवता येत होत्या. नव्या आकृतिबंधानुसार विद्यार्थ्यांना विस्तृत उत्तरे लिहावी लागणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अशाच धर्तीवर घेतल्या जातात. सध्याच्या स्पर्धात्मक युगात एमपीएससीच्या परीक्षांचा स्तर उंचावला पाहिजे या हेतूनेच आकृतिबंधात हा बदल करण्यात आला. प्रत्येक प्रश्नाची विस्तृत उत्तरे लिहायची म्हणजे कष्ट अधिक, वेळ अधिक आणि अभ्यासही अधिक हे ओघाने आलेच. विद्यार्थी वर्गाची यालाच तयारी नव्हती. यापूर्वी फक्त मराठी आणि इंग्रजी भाषेतील निबंधलेखनाच्या परीक्षेला विस्तृत लिहावे लागत असे. बाकीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये वस्तुनिष्ठ उत्तरे देऊन चालत असे. नव्या पॅटर्ननुसार एमपीएससीच्या परीक्षा यापुढे एकूण 1750 गुणांच्या असणार आहेत. यंदापर्यंत (किंवा आता पुढील वर्षीपर्यंत) या परीक्षा एकूण 800 गुणांच्या होत्या. नव्या पॅटर्ननुसार परीक्षेला बसणार्या उमेदवाराला एकाच वेळी एमपीएससी आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे युपीएससी परीक्षेसाठी एकत्रित अभ्यास करणे तुलनेने सोपे जाईल. या सर्व बाबी आंदोलक विद्यार्थ्यांना बहुतांशी मान्य होत्या तरीही अशा प्रकारे अभ्यास करण्याइतका वेळ त्यांना मिळालेला नाही अशी त्यांची तक्रार होती. राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे हे दुखणे राज्य सेवा आयोगाला पटवून दिले आणि विद्यार्थीवर्गाचा जीव भांड्यात पडला.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …