निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची माहिती
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी (दि. 23) कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होणार असून, पोलीस व इतर सुरक्षा दलाच्या जवानांसह सुमारे 1800 अधिकारी व कर्मचारी हे मतमोजणी यशस्वीरीत्या पार पाडण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. 20) पत्रकारांना दिली.
मतमोजणीची रंगीत तालिम बुधवार (दि. 22) जिल्हा क्रीडा संकुलातच होणार आहे. निवडणूक आयोगाकडून आणखीही दोन निरीक्षक यादिवशी मतमोजणीच्या ठिकाणी असतील. निवडणूक निकाल फेरीनिहाय सर्वसामान्य जनतेला कळावा, म्हणून उद्घोषणेची व्यवस्था करण्यात आली आहे.
या लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा मतदारसंघ निहाय होणार्या प्रत्येक मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल असणार आहेत. त्यानुसार एकुण लोकसभा मतदार संघाच्या 156 फेर्या होणार आहेत. सर्वाधिक फेर्या 28 महाड आणि सर्वात कमी फेर्या 23 गुहागर या विधानसभा मतदारसंघाच्या होणार आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 10लाख 20हजार 140 मतदारांनी मतदान केले आहे.एकुण 61.76 टक्के मतदान झालेल आहे.
क्रीडा संकुल येथे कडक पोलीस बंदोबस्त असून मतमोजणीच्या दिवशीदेखील अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे.
अशी होणार मतमोजणी
मतमोजणी गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरू केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबलनिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्व विधानसभा मतदारसंघातील 84 टेबलनिहाय पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसरी फेरीची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. सर्वप्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात ईटीपीबीएसचे एकूण 1405 मतदार व पोस्टल बॅलेटचे एकूण 9399 असे एकुण 10804 मतदार आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत अनुक्रमे 755 व 4805 असे एकुण 5560 मते प्राप्त झालेली आहेत सर्व प्रथम या मतपत्रिकांची मतमोजणी केली जाणार आहे.
टपाली मतमोजणीकरीता स्वतंत्र अधिकारी
टपाली मतपत्रिकेसाठी 8 टेबल ठेवण्यात येणार असून, प्रत्येक टेबल निहाय 1 पर्यवेक्षक व 2 सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
अधिकारी कर्मचारी तैनात
मतमोजणीसाठी पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक, सुक्ष्म निरीक्षक असे 360 जण असणार आहेत याव्यतिरिक्त संगणक कामासाठी, इव्हीएम स्ट्राँग रूममधून आणणे, त्यांची सुरक्षा, टपाली मतपत्रिका मतमोजणी सुक्ष्म निरीक्षक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणीच्या 21 समित्यामधील कर्मचारी गुरुवारी याठिकाणी आपली जबाबदारी सांभाळणार आहेत.
तीन टप्प्यात ईव्हीएम वाहतूक
सहा विधानसभा मतदार संघ निहाय इव्हीएम सुरक्षा कक्षात स्वतंत्र सिलबंद करण्यात आलेले आहे. सुरक्षा कक्षातील ईव्हीएम मतमोजणी कक्षात अचुकरित्या पाठविण्यासाठी तहसिलदार दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच सुरक्षा कक्ष ते मतमोजणी कक्ष दरम्यान ईव्हीएम वाहतुक व्यवस्थापनाकरीता उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षा कक्षातून विधानसभा निहाय मतमोजणी कक्षातील 1 ते 14 टेबलवर ईव्हीएम वाहतुकीसाठी तीन टप्यात पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पहिला टप्पा- स्ट्राँग रुमपासून ते प्रवेशद्वार
दुसरा टप्पा- प्रवेशद्वारापासून मतमोजणी प्रवेद्वारापर्यंत
तिसरा टप्पा- मतमोजणी प्रवेशद्वार
सीसीटीव्हीची नजर
मतमोजणी केंद्र परिसरात 90 सीसीटीव्हीचे जाळे असून शिवाय टेहळणी मनोरेदेखील उभारण्यात आले आहेत. यावरून जवान 24 तास अतिशय बारकाईने नजर ठेवून असतात.