कर्जत : बातमीदार
तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बळीवरे नदीवरील पुलाखाली रेती उत्खनन सुरू असून, या रेती उत्खननामुळे येथील पुलाला धोका निर्माण झाला आहे. रेती उत्खनन करून पुलाखाली मोठमोठे खड्डे केले आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाळू माफियांची मुजोरी वाढली असल्याचे दिसून येत आहे.
कर्जत तालुक्यात नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन तसेच दगडी फोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नदी पत्रातून दिवसा व मध्यरात्री वाळू चोरीचे प्रकार सर्रास घडत आहेत. मात्र त्याकडे महसूल विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यापासून अवैध वाळू चोरीविरुद्ध कारवाई थंडावल्याने वाळू माफियांनी मजल वाढली आहे, रेती उपशामुळे अनेक नदी, ओढे पात्र कोरडे पडले आहेत. या प्रकरामुळे अनेक पुलांंना धोका निर्माण झाला आहे.
कर्जत, कशेळे, नेरळ, कळंब, खांडस, पोशीर या सर्व भागात रात्री- अपरात्री नदी पात्रातून वाळू चोरीचा प्रकार सुरू आहे. अवैध वाळू चोरी करणार्यांवर अंकुश बसावा, म्हणून प्रशासनाने दंड लागू केला आहे. काही महिन्यांपूर्वी डिकसळ भागात अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई थंडावली आहे. त्यामुळे वाळू माफीये पुन्हा सक्रिय झाले आहेत.
सध्या कर्जतसह सर्वत्र बांधकामासाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेती चोरी करण्यात येत आहे. मात्र महसूल विभागाकडून चोरी करणार्या वाहनांविरुद्ध कडक कारवाई अभावी वाळू माफियांना एक प्रकारे अभय मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी पुढे येत आहे.