आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
नवी मुंबई : प्रतिनिधी : नवी मुंबईतील विविध नागरी समस्या, तसेच प्रलंबित अनेक विषयांसंदर्भात बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याबरोबर नुकतीच बैठक झाली. सदर बैठकीत न्यू पामबीच सोसायटीतील घरांना कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, तेथील प्रवेशद्वारासमोर असणारे दुभाजक, सोसायटी मागील असणार्या नाल्यांमुळे रहिवाशांना होणारा त्रास, तसेच त्रिमूर्ती सोसायटी नेरूळ येथील नागरिकांच्या विविध समस्या, दिवाळे गावातील मच्छीमार्केटच्या मागील बाजूस स्थलांतरित करून रस्ता रुंदीकरण करणे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत राजू तिकोने, पामबीच रेसिडेन्सी अमेय सोसायटीचे मनोज म्हात्रे, रवींद्र भगत, तसेच अनेक रहिवासी उपस्थित होते.
या वेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नेरूळ येथील पामबीच रेसिडेन्सी सोसायटीचे पदाधिकारी यांनी माझ्या निवासस्थानी येऊन त्यांच्या नागरी समस्यांचे निवेदन दिले होते. त्यांच्या समस्या रास्त असून त्यांना राहण्यास आल्यापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नवी मुंबई महापालिकेचे स्वतःच्या मालकीचे धरण असताना नवी मुंबईतील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यामुळे रहिवाशांना होणारा दुर्गंधीचा त्रास, दिवाळे गावातील रस्त्यांचे रुंदीकरण, तसेच नेरूळ येथील त्रिमूर्ती सोसायटी येथील नागरी समस्या अशा अनेक विषयांवर चर्चा झाली असून पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, तसेच लवकरच संबंधित अधिकार्यांसमवेत दौरा करणार असल्याचे पालिका आयुक्त यांनी सांगितले असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.