कर्जत : प्रतिनिधी
माथेरान सेंट झेव्हीयर शाळेतील हुशार विद्यार्थी आयजॅक पर्सी ब्रिट्टो शालांन्त परीक्षेत 65 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. पण परीक्षेचा निकाल घेण्यापुर्वी जन्मजात अनमिया बोर्न मॅरो (कर्करोग) या आजाराने तो निधन पावल्याची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेला 19 मे रोजी एक वर्ष पुर्ण झाले. या निमित्ताने आयजॅकच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी माथेरानच्या सेंट झेव्हीयर शाळेतील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांकडून प्रार्थना पठण करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आयजॅकच्या अचानक जाण्याने संपुर्ण सेंट झेव्हीयर शाळेवर तसेच त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली होती. 19 मे या दिवशी आयजॅकने या जगाचा निरोप घेतला त्याची आठवण म्हणून शाळेच्या परिसरात मैत्रीचा कट्टा बनविण्यात आला आहे.
या वेळी आयजॅकची प्रतिमा या कट्ट्यावर ठेऊन फुलांनी सजविण्यात आली होती. यानंतर उपस्थितांकडुन मेणबत्त्या प्रज्वलीत करुन भावपुर्ण वातावरणात प्रार्थनेसह श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर पावलीन, सिस्टर जेम्स फीलोमिना, सिस्टर शांता सिस्टर ललिता, शिक्षक योगेश जाधव, स्वाती कुमार यांच्यासह सर्व शिक्षक आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.