कर्जत शहरात वाहतूक कोंडी होण्याचे कारण म्हणजे कुठेही उभ्या करण्यात येणार्या रिक्षा आणि बाजारपेठेतील दुतर्फा असलेले हातगाडीवाले आणि फेरीवाले. या सर्वांमुळे कर्जतच्या बाजारपेठेतच नव्हे तर शहरातून चालणे कठीण होत आहे. त्यांच्यावर कुणाचाच वचक नाही असा सूर कर्जतकरांकडून ऐकायला मिळतो, परंतु अनेकजण याबाबतीत पाठपुरावा करतात, मात्र त्याला यश येत नाही. दिवसेंदिवस शहरातील वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरत आहे. आता तर गणपतीचा उत्सव आला आहे. त्यामुळे खरेदीसाठी दोन्ही बाजारपेठांमध्ये खूप गर्दी होत आहे. त्याचे कारण संबंधित अधिकार्यांची मानसिकता. कर्जत ग्रामपंचायत असताना रस्ते फार लहान होते. ते रुंदीकरण करण्याचे काम माजी आमदार स्व. तुकाराम सुर्वे यांनी हाती घेतले होते. त्या वेळी त्यांना खूप विरोध झाला होता. त्याला न जुमानता रस्ते थोडेसे रुंद झाले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण हे रस्ते त्या वेळीदेखील म्हणजे 35-40 वर्षांपूर्वी हातगाडीवाल्यांनी काबीज केले होते. त्यानंतर कर्जत ग्रुप ग्रामपंचायत आणि दहिवली ग्रामपंचायतीची एकत्रित कर्जत नगर परिषद जाहीर झाली. ही घटना 1992 सालची. त्यानंतर 1994 साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सत्ता आली. पुढे 1999 साली काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती करण्यात आली. त्या वेळी झालेल्या निवडणुकीत सुरेश लाड आमदार झाले. त्या वेळी रस्ते मोठे होऊनही त्याचा काही उपयोग झाला नाही. बाजारपेठेतील रस्त्यांच्या दुतर्फा हातगाडी व फेरीवाल्यांनी ठाण मांडले. खरेतर नगर परिषद परवाना असलेल्या हातगाड्या किती? आणि प्रत्यक्षात हातगाड्या किती? हा म्हणजे संशोधनाचा विषय आहे. त्यांच्यावर ठोस कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. कुणीतरी विरोध केला की तात्पुरती मलमपट्टी करण्याचे प्रकार होत असतात, मात्र काही दिवसांनी जैसे थे परिस्थिती होते.
कपालेश्वर मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळादरम्यानच्या रस्त्यावर नो हॉकर्स झोन करण्याचे ठरले होते. त्यानंतर त्या रस्त्यावर हातगाडीला बंदी घालण्यात आली होती. हा ठराव करताना त्यावेळी जे नगरसेवक होते. त्यातील दोन-तीन नगरसेवक आतासुद्धा नगर परिषदेत आहेत, मात्र याबाबत ते काहीही करू शकत नाहीत. मध्यंतरी या रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांना उठवण्यात आले होते, मात्र मतांच्या राजकारणासाठी त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला आणि ही कारवाई औटघटकेची ठरली. आता तर त्या रस्त्यावरून चालणेही कठीण होऊन बसले आहे. फेरीवाले, हातगाडीवाले रस्त्यावर बसतात त्यात भर म्हणून शासनाने रिक्षा परवाने खुले केले. त्यामुळे अनेक बेरोजगार युवक रिक्षा व्यवसायात पडले. रस्ते तेच मात्र वाहनांची संख्या दुप्पट, तिप्पट झाल्याने त्यांचे नियोजन करता करता पोलीस कर्मचार्यांची दररोज कसरत होते. कर्जत शहरात कोणत्याही चौकात मोकळी जागा नाही. सर्वच ठिकाणी रिक्षावाले अगदी बिनदिक्कतपणे रिक्षा उभ्या करतात. एक आहे ज्या वेळी आरटीओचा कॅम्प असतो तेव्हा यातील काही रिक्षा आडबाजूला लावल्या जातात. याकडेही दुर्लक्ष केले जाते. काही महिन्यांपूर्वी टोविंग वॅन उपलब्ध होती, मात्र पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन याची जबाबदारी घेत नसल्याने ती बंद आहे. पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारीही कमी आहेत. त्यामुळे त्याचाही नाईलाज आहे. टोविंग वॅन सुरू असताना चांगली शिस्त लागली होती. वाहतूक कोंडीची समस्याही बर्यापैकी सुटली होती, मात्र आता सारे पुन्हा सुरू झाले आहे.
हातगाडी व फेरीवाले यांच्यासाठी एक वेगळेच ठिकाण ठरवून त्यांची व्यवस्था करायला हवी. कोरोनाच्या काळात या सर्वांना पोलीस मैदानात व्यवस्था करून दिली होती. त्यावेळी सर्वांना सोयीस्कर झाले होते. त्या वेळी दिवसाही बाजारातील रस्ता खूप मोठा आहे. हे पहायला मिळत होता. दुसरा उपाय म्हणजे चारचाकी गाड्या बाजारपेठेत येऊ न देणे. ठरवलेले एक दिशा मार्ग अमलात आणणे. तरच शहरातील वाहतुकीची समस्या सुटू शकेल.
-विजय मांडे
Check Also
खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त
पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …