Breaking News

रायगडातील पर्यटनस्थळे फुलली!

मुरूड, माथेरान : प्रतिनिधी

गुलाबी थंडीची चाहूल लागताच पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे पडू लागली आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील विविध प्रसिद्ध ठिकाणे रविवारी (दि. 15) पर्यटकांनी गजबजली होती. विशेषकरून मुरूड आणि माथेरानमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक आले होते.

रविवारचा सुटीचा दिवस पाहून अनेक पर्यटक मुरूड येथे आले होते. येथील पर्यटकांचे आकर्षण असलेला जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक येत असतात. गेले काही दिवस हवामान उष्ण होते, परंतु आता गारवा वाढू लागल्याने पर्यटक येथे येऊ लागले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांच्या सहलीही मोठ्या प्रमाणात आल्याने खोरा बंदर व राजपुरी नवीन जेटीवर खचाखच गर्दी होती.

दुसरीकडे निसर्गरम्य व प्रदूषणमुक्त माथेरानमध्येदेखील पर्यटकांची मांदियाळी जमली होती. यंदा जोरदार कोसळलेल्या पावसामुळे माथेरानची पर्यटकसंख्या रोडावली होती. त्यातच मिनीट्रेन बंद असल्यामुळे अनेकांनी माथेरानकडे पाठ फिरवली होती. अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर माथेरानमध्ये पर्यटक दाखल झाल्याने संपूर्ण माथेरान फुलल्याचे दिसून आले. त्यामुळे येथील व्यावसायिक, हॉटेलचालक व व्यापारीवर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply