नांदेड येथील सरकारी रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी निश्चितच धक्कादायक आहे. अवघ्या दीड महिन्यांपूर्वी ठाण्यानजीकच्या छत्रपती शिवाजी सरकारी इस्पितळामध्ये एका रात्रीत 18 रुग्ण दगावले होते. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर पडणारे हे दुर्दैवाचे घाले तातडीने थांबायला हवेत यात शंकाच नाही. इस्पितळामधील हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याची चौकशी अत्यंत तातडीने करून वेळीच उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. नांदेड येथे घडलेला प्रकार दुर्दैवी तर आहेच, परंतु त्याहीपेक्षा मोठे दुर्दैव याबाबत होणारे राजकारण आहे.
काही घटना किंवा मुद्यांच्या बाबत राजकारण करू नये हे पथ्य सर्वच पक्षाच्या नेत्यांनी पाळायचे असते. नेता स्थानिक असो वा राष्ट्रीय पातळीवरचा, संवेदनशील गोष्टींबाबत त्याने संवेदना व्यक्त करणे समजू शकते, पण अशा गोष्टींचा राजकीय मुद्दा करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रकार संतापजनक वाटतो. नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्ण दगावल्याची माहिती सोमवारी हाती आली. या 24 दुर्दैवी रुग्णांमध्ये 12 नवजात शिशुंचा समावेश आहे. त्यातील 11 नवजात बालके ही तीन दिवसाच्या आतील आहेत आणि जन्मत:च श्वसनसंस्था विकसित न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या तेथील बालरोग विभागात 142 बालकांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 42 बालके अतिदक्षता विभागात ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी दिली आहे. अन्य मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये 4 हृदयविकाराने, 1 विषबाधा, 1 जठरव्याधी, 2 किडनीव्याधी, 1 प्रसूती गुंतागुंत, तर तिघांचा अपघात आणि इतर आजाराने मृत्यू झाला आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये अनेकदा रुग्णांना कमालीच्या अत्यवस्थ स्थितीत आणले जाते. अन्यत्र उपाय करून झाल्यानंतर केस हाताबाहेर गेल्यावर सरकारी इस्पितळ गाठण्याकडे अनेकांचा कल असतो. यातून असे प्रकार संभवतात. परंतु औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नांदेड येथील रुग्णालयातील मृत्यूचे तांडव पाहावे लागले अशी टीका विरोधकांनी सुरू केली आहे. वास्तविक औषधांचा तुटवडा हे कारण आता असू शकत नाही. कोरोनानंतर आपण सारे बरेच धडे शिकलो आहोत. औषधांचा तुटवडा पडल्यास सरकारी रुग्णालयात देखील बाजारातून औषधे विकत घेण्याचा मार्ग अवलंबला जातो. विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही हे तर उघडच आहे. कारण औषधांचा तुटवडा नव्हता असे या रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. सरकारी रुग्णालयामध्ये मृत्यूचे प्रमाण अचानक वाढीस का लागले या प्रश्नाचे उत्तर शोधताना अन्य बाबी तपासून पहाव्या लागतील. आरोग्य व्यवस्थेकडे अजुनही योग्य पद्धतीने लक्ष दिले जात नाही याची कारणे प्राय: स्थानिक पातळीवरच शोधावी लागतात. ठाण्यातील रुग्णालयामध्ये 18 जण दगावल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच सरकारी रुग्णालयांमधील व्यवस्थांचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते. सरकारी आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे हे तर सारेच जाणतात. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यविषयक सुधारणांना गती देण्याचा प्रयत्न केला. गरज आहे ती असे प्रकार रोखण्यासाठी सर्वांनीच प्रामाणिक प्रयत्न करण्याची, परंतु दुर्दैवाने अशा प्रयत्नांना राजकीय डावपेचांमुळे खीळ बसते. ठाणे किंवा नांदेड या दोन्ही ठिकाणी झालेल्या घटना दुर्दैवी निश्चितच आहेत, पण राजकारण हा त्यावरचा उपाय नव्हे.